काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
.
माफी मागणे ही केवळ पळवाट; राज्यभरात आंदोलन सुरूच राहणार
शायना एन. सी. यांनी ट्विटद्वारे मागितलेली माफी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘अनावधानाने चूक झाली’ असे दिलेले स्पष्टीकरण संजय राऊत यांनी पूर्णपणे फेटाळून लावले. जर तुम्हाला पुस्तक फाडायचे होते किंवा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडायचा होता, तर अय्यर यांचा स्वतंत्र फोटो आणायचा होता. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो प्रत्येकासमोर का ठेवण्यात आला? हा प्रकार अनावधानाने झालेला नसून बाळासाहेबांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठीच तो फोटो आणला गेला होता.
पक्षातून हकालपट्टी का केली नाही?
अमित शहा यांच्या मर्जीने नेमलेले नेते स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवतात, मग त्यांच्याच पक्ष कार्यालयात बाळासाहेबांचा फोटो फाडला जात असताना त्यांनी त्या 5 जणांवर काय कारवाई केली? त्यांची पक्षातून हकालपट्टी का केली नाही? उलट एकनाथ शिंदे या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत.

जनतेच्या आक्रोशामुळे माफीचा देखावा
कालपर्यंत हे लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) खोटा फोटो दाखवून ‘आम्ही फाडलेच नाही’ असा दावा करत होते. मात्र, शिवसैनिक आणि मराठी जनतेचा उद्रेक पाहिल्यानंतर प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माफी मागितली. माफी मागणे ही केवळ पळवाट असून राज्यभरात शिवसैनिकांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राऊत यांनी दिला.
नाना चुडासामा यांच्या संबंधांवर स्पष्टीकरण
शायना एन. सी. यांनी वडिलांच्या काळापासून बाळासाहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचा दावा केला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, नाना चुडासामा आणि मधू मेहता हे समाजवादी विचारांचे नेते शिवसेनेचे टीकाकार होते, पण बाळासाहेबांशी त्यांचा चांगला संवाद होता. मात्र, त्याचा आधार घेऊन आज बाळासाहेबांचा केलेला अपमान लपवता येणार नाही. “भारतीय न्याय संहितेत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच अपमान झाला की गुन्हा दाखल होतो का? बाळासाहेबांचा अपमान झाल्यावर पोलीस गप्प का?” असा सवालही त्यांनी विचारला.
4 पंटरांना सोबत घेऊन 800 मतदारसंघ तोडू देणार नाही
आगामी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) विधेयक आणले जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, देशात 800 ते 860 खासदार निवडून आणून संसदेचा बाजार मांडण्याच्या प्रयत्नाला आमचा तात्विक विरोध आहे. हा केवळ भाजपचा विषय नसून राष्ट्रीय आणि लोकशाहीच्या भविष्याचा प्रश्न आहे.
या विषयावर केंद्र सरकारने देशातील प्रमुख विरोधी पक्षांशी कोणतीही चर्चा केलेली नाही. सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसशी, 41 खासदार असलेल्या समाजवादी पक्षाशी, 28 खासदार असलेल्या तृणमूल काँग्रेसशी आणि आमचा पक्ष फोडल्यानंतरही लोकसभा व राज्यसभेत मिळून 4 (3 लोकसभा आणि 1 राज्यसभा) खासदार असलेल्या शिवसेनेशी चर्चा का केली नाही? अमित शहा आपल्या 4 फंटरांना सोबत घेऊन मतदारसंघांची तोडफोड करू शकत नाहीत, असे राऊत यांनी ठणकावले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली विधाने ही न्याय्य पुनर्रचनेच्या बाजूने असून, 3 दिवसांपूर्वीच त्या सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होत्या; त्यामुळे संपूर्ण इंडिया आघाडी एकसंध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोलंबिया विद्यापीठात जाऊन मोदींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना इंग्रजीत उत्तरे देऊन दाखवावीत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताचा अपमान करतात, या भाजपच्या आरोपांचा राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, राहुल गांधी एक सुशिक्षित नेते आहेत, म्हणून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने त्यांना संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले आहे. तिथे राज्यशास्त्र आणि मानसशास्त्राचे विद्यार्थी समोर बसून थेट प्रश्न विचारतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही कोलंबिया विद्यापीठाने बोलवावे; पण तिथे कॉपी न करता आणि टेलिप्रॉम्प्टरशिवाय शुद्ध इंग्रजीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मोदी उत्तरे देऊ शकतील का? इथे भारतातच ते प्रश्नांपासून पळ काढतात. देशात महागाई आणि बेरोजगारी किती भयावह स्थितीत आहे, हे सांगण्यासाठी राहुल गांधींची गरज नसून जनता ते रोज अनुभवत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
———————————————————————-
हेही वाचा…
20 वर्षे काँग्रेसमध्ये पदे भोगताना सावरकरांचा अपमान दिसला नाही का?:सोनिया गांधींचे पुस्तक फाडणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची अखिल चित्रेंनी काढली कुंडली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडल्यानंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. ज्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर टीका केली, त्यातील प्रमुख सूत्रधार हे स्वतः अनेक दशके काँग्रेसमध्येच कार्यरत होते, याची आठवण करून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अखिल चित्रे यांनी शिंदे गटावर जोरदार पलटवार केला आहे. समाजमाध्यम ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत चित्रे यांनी संजय निरुपम, आनंद दुबे आणि सुशिबेन शहा यांच्या जुन्या काँग्रेस कारकीर्दीचा पाढा वाचत, “राजकीय सोयीनुसार जागे होणारे हे सावरकरप्रेम आहे,” असा सणसणीत टोला लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी