![]()
सातारा शहरातील असलेल्या गेंडामाळ परिसरातील फाशीचा वड येथे सतरा जणांना स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी सरकारने 8 सप्टेंबर 1857 रोजी देह दंडाची शिक्षा सुनावली. आज बरोबर या घटनेला 169 वर्षे पूर्ण झाली. सातारा राजद्रोहाच्या खटल्याचा इतिहास.
.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासूनचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. १७५७ ते १८५७ चा एक कालखंड म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ( रॉबर्ट क्लाइव्ह ) व बंगालचा नवाब ( सिराज उद दौला) यांच्यातील लढाई , १८५७ ते १९२० हा एक कालखंड आणि १९२० नंतर १९४७ पर्यंत हे सगळे जाणून घेऊन मग भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आपल्याला समजून घेता येईल. भारतीय स्वातंत्र्य चळवळी चा इतिहासाचा जर धांडोळा घेतला तर आपल्याला त्यातून सातारा जिल्हा वगळताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण त्यावेळच्या सातारा प्रांतामध्ये थोरल्या प्रताप सिंह महाराजांनी इंग्रजांच्या विरोधात जाऊन रोष पत्करला , रंगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली उठाव , असहकार आंदोलन , कायदेभंगाची चळवळ , प्रति सरकार व भूमिगत चळवळ यामुळे सातारला स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातून कोणी वगळू शकत नाही. आज ८ सप्टेंबर आहे आणि बरोबर १६९ वर्षापूर्वी आजच्या दिवशी ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या तीन सदस्यीय ज्युरी मंडळाचे पुढे सातारा राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.त्याचा निकाल दिला गेला आणि १७ जणांना देह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
आपण सातारा राजद्रोहाचा ( Satara Treason Case ) खटला नेमका काय होता हे जाणून घेऊ. म्हणजे आपल्याला गेंडा माळावरील फाशीचा वड व १८५७ चा रंगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली उठाव याची माहिती मिळेल. त्यावेळच्या सामाजिक , शैक्षणिक , राजकीय , धार्मिक परिस्थिती यावर प्रकाश टाकायला हवा सातारच्या गेंडा माळावर ८ सप्टेंबर १८५७ रोजी १७ जणांना राजद्रोहाच्या खटल्यामध्ये दोषी ठरवून देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली व त्यांची संपत्ती सरकार जमा करून टाकली.
हा खटला, हा उठाव व हे सतरा जण कोण होते. याची आपल्याला माहिती घेता असे दिसते की उठाव करणाऱ्यातली व त्यात सहभागी झालेली सर्व माणसे समाजातल्या तळातील होती. रामोशी , मांग , महार , कुणबी , कायस्थ प्रभू , सोनार या अठरापगड जातीतल्या लोकांचा यात सहभाग होता.
सातारचे थोरले प्रतापसिंह महाराज यांना पाच सप्टेंबर १८३९ रोजी ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पदच्युत केले व त्यांना अवमानकारक पद्धतीने अटक करून लिंब येथील गुरांच्या गोठ्यात ठेवले आणि तेथून बनारसला पाठवले आणि तेथेच त्यांचा १८४७ मध्ये मृत्यू झाला. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने एक मे १८४९ ला सातारचे राज्य खालसा केले.
थोरल्या प्रतापसिंह महाराजांची झालेली ससेहोलपट यामुळे या परिसरात असंतोष पसरला. परिणामी अनेक उठाव झाले. भोर जवळील कारी येथील रंगो बापूजी गुप्ते हे याच काळात थोरल्या प्रताप सिंह महाराज यांची बाजू मांडण्यासाठी लंडनला गेले होते. १४ वर्षे प्रयत्न करूनही त्यांना त्यात अपयश आले. दरम्यान थोरल्या प्रतापसिंह महाराज यांचे निधन झाले. तेव्हा काहीही करून साताऱ्याची गादी पुन्हा स्थापन करण्याचा निश्चय रंगो बापूजी गुप्ते यांनी केला. रंगो बापूजी गुप्ते यांनी १८५५ च्या ऑक्टोबर मध्ये मुंबई सरकारकडे अखेरचा अर्ज सादर केला. तो फेटाळला. यावेळी रशिया व इंग्लंडमध्ये तणाव होता. तेव्हा इंग्रजांशी युद्ध करण्यासाठी दक्षिण व उत्तर भारतातून उठाव करावा. त्यामध्ये सातारच्या गादीने पुढाकार घ्यावा असे रंगो बापूजी गुप्ते यांनी ठरवले आणि तशाप्रकारे त्यांनी तयारी सुरू केली.
१८५६ पासून रंगो बापूजींनी सैन्य भरतीचे काम सुरू केले. याच काळात सातारा येथील पोलीस दलाचे प्रमुख आणि अंतोजीराव शिर्के यांनी देखील ४० हजार रोहिले उभे करून बंडाची तयारी केली होती. वातावरण निर्माण झाले तरी १८५६ मध्ये कोणताच उठाव झाला नाही हे वास्तव आहे. १८५७ च्या मे महिन्याच्या अखेरीस हल्ला करण्याच्या इराद्याने बेळगाव ,कोल्हापूर, धारवाड , सातारा येथील सैन्य पलटणीमध्ये असंतोष पसरवण्याचे काम सुरू होते या कामासाठी भोरचे पंतसचिव यांनी सक्रिय मदत केली. सातारा , यवतेश्वर , महाबळेश्वर असा एकत्रित उठाव करून सातारा किल्ला ताब्यात घ्यायचा .भोर येथे दारूगोळा व सैन्य तयार होते. प्रतापसिंह महाराजांचा दत्तक पुत्र शाहू सेनापती बाळासाहेबांचा पुत्र दुर्गासींह यांच्याकडे याचे नेतृत्व होते आणि अंतोजीराव शिर्के यांनी पोलिसांना बंड वाल्यांच्या बाजूने उभे केले होते. दहा जून १८५७ ला भोर जवळील बांगरवाडी पासून बंडखोरांचे सैन्य साताऱ्याकडे निघाले. मात्र साताऱ्यात पोहोचण्यापूर्वीच साताऱ्याजवळ त्यांना कंपनी सरकारच्या सैन्याने अडवले. 13 जण पकडले गेले. बारा जून १८५७ रोजी मानसिंग यास पकडण्यात आले. हा सातारच्या न्यायालयाचा निरोप्या म्हणजेच मेसेंजर होता. त्याला वीस जून रोजी फाशी देण्यात आली. मानसिंगकडून मिळालेल्या माहितीवरून अजून सतरा जणांना पकडण्यात आले.
रंगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखालील या सातारच्या उठावा मध्ये त्यांनी जी सैन्य भरती केली त्या ठिकाणांमध्ये येकमुल्ली , जकातवाडी , फलटण , वाठार , वर्धनगड , बेळगाव , येनेवाडा , शहापूर , देऊर , कळंबी , अरबवाडी , कराड , अरबूजाबाद , आरळे , कोल्हापूर यांचा समावेश होता.
रंगो बापूजी गुप्ते व त्यांच्या सहकार्याने विरोधात ईस्ट इंडिया कंपनी सरकार विरोधात उठाव करण्याचा प्रयत्न केला म्हणून ईस्ट इंडिया कंपनी सरकारने त्यांची धरपकड केली. पण शेवटपर्यंत रंगो बापूजी गुप्ते हे सापडले नाहीत. कंपनी सरकार विरुद्ध सैन्याची जमवाजमव करणे , बंदुकीच्या गोळ्या तयार करणे , कंपनी सरकार विरोधी जनमानस भडकवणे , कंपनी सरकारची ठिकाणे लुटणे , जेलमधून कैद्यांना सोडणे , पोलिसात फंदफितूरी करणे , कंपनी सरकार विरोधात कट रचणे या आरोपाखाली या सतरा जणांविरुद्ध आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.
ईस्ट इंडिया कंपनी सरकारने चार्ल्स फोर्ब्स यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचे विशेष न्यायालय यासाठी स्थापन केले होते. कर्नल जी माल्कम आणि कॅप्टन जेम्स रोझ हे अन्य दोन सदस्य या विशेष न्यायालयाचे सदस्य होते. या विशेष न्यायालया पुढे या १७ जणांच्या विरुद्धच्या आरोपाचा खटला चालला. दिनांक 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 1857 या कालावधीत या खटल्याची सुनावणी झाली यामध्ये 17 साक्षीदार तपासले गेले. सखाराम दाजी काबडे आत्माराम उर्फ आप्पा बिन बाबाभट तसेच सिताराम रंगो गुप्ते यांची साक्ष व जबाब महत्त्वाचे मानले गेले.
सात सप्टेंबर १८५७ रोजी या खटल्याचा निकाल विशेष न्यायालयाने जाहीर केला आणि सर्वांना दोषी ठरवले. आणि त्यांना देह दंडाची शिक्षा सुनावली तसेच या सर्वांची स्थावर मालमत्ता सरकार जमा करण्याचे आदेशही दिले. देह दंडाची शिक्षा सुनावताना पाच जणांना फाशी , सहा जणांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारण्याचे तर सहा जणांना तोफेच्या तोंडी देण्याचे आदेश दिले.
ज्यांना देह दंडाची शिक्षा सुनावली गेली त्यांची नावे पुढीलप्रमाणे नारायण उर्फ बापू पावसकर , मानाजी उर्फ बापू उर्फ नारायण बाबर भांदिर्गे , केशव नीलकंठ उर्फ अण्णा मामा चित्रे , शिवराम मोरे बहुश्रुत , सखाराम उर्फ बळवंत चव्हाण , रामजी उर्फ बापूजी चव्हाण , बबीया रंगू शिरतोडे , बबिया नाथा गायकवाड , येसू नाथा गायकवाड , नाम्या उर्फ नायकू चव्हाण , शिवा सोमजी , पर्वती विठोजी साळोखा , विठ्ठल कोंडी वासनीस , गणेश सखाराम कारखानीस , पाटलू येशू घाटगे , सिताराम रंगो गुप्ते , आणि नाना उमाजी मुडके यांचा समावेश आहे. या सतरा जणांच्या देह दंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी दि 8 सप्टेंबर 1857 रोजी गेंडा माळ येथील फाशीचा वड येथे करण्यात आली.
हा सातारच्या राजद्रोहाचा खटला व त्याचा इतिहास. आजही या 17 जणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून काहीही मिळालेले नाही. विशेष म्हणजे हा कट यशस्वी झाला नाही पण तरीही या सर्वांना देहदंडाची शिक्षा सुनावली गेली हे विशेष. उठाव करणारी माणसे सर्वसामान्य कुटुंबातील होती. या शहिदांना अर्थात हुतात्म्यांना यांना विनम्र अभिवादन.
( संपर्क – ९८२२६५३५५८ )