पुण्यातील लोहगडावर व्यावसायिक केतन अग्रवालला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणात आता रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या हत्येच्या कटात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यानंतर आता एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झ
.
कटात तिसऱ्याची एन्ट्री; कोण आहे हा तरुण?
केतन अग्रवालच्या खुनाचा कट सिया आणि चेतन व्यतिरिक्त आणखी एका तरुणाला आधीपासूनच माहीत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या तो पुण्यातील बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता. चेतन आणि सियाने आपण केतनला कसे वाटेतून बाजूला करणार आहोत, याच्या संपूर्ण कटाची या तरुणासोबत चर्चा केली होती. त्यांनी या तरुणाला 18 जून रोजी लोहगडावर सोबत येण्याचा आग्रहही केला होता. मात्र, त्याने नकार दिला आणि ‘असे काही करू नका’ असा सल्लाही या दोघांना दिला होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, केतनचा खून केल्यानंतर चेतन सगळ्यात आधी याच मित्राला भेटला होता. त्यानंतर सियानेही त्याच्याशी संपर्क साधला होता. पोलीस सध्या त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल चॅट्स तपासत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून, पोलीस त्याला या गुन्ह्यात ‘माफीचा साक्षीदार’ बनवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
सिया गोयलचा मुजोरपणा; कॅमेऱ्यांसमोर अश्लील हावभाव
पुणे ग्रामीण पोलिसांनी 18 जून रोजी (घटनेच्या दिवशी) सियाने परिधान केलेले कपडे जप्त करण्यासाठी तिला गुरुवारी तिच्या पुण्यातील निवासस्थानी नेले होते. हे कपडे आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील. मात्र, घराचा पंचनामा करून बाहेर पडताना, तिथे उपस्थित असलेल्या माध्यमांचे कॅमेरे पाहताच सियाने हाताने मिडल फिंगर दाखवले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या या मुजोरपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खून करूनही तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नसल्याचे यातून दिसून आले आहे.
हत्येची ‘रिहर्सल’ आणि ‘पॉलीग्राफ टेस्ट’ची मागणी
गुरुवारी सकाळी पोलीस सिया गोयलला पुण्याच्या लुल्लानगर परिसरातील एका क्लबजवळ घेऊन गेले. याच ठिकाणी मे महिन्यात सिया आणि चेतनने ‘एखाद्या व्यक्तीला कड्यावरून कसे ढकलायचे’ याची रिहर्सल (सराव) केली होती. सियाने ती जागा ओळखली असून पोलीस आता त्यावेळी तिथे कोण-कोण उपस्थित होते, याचा शोध घेत आहेत. तपासाला गती देण्यासाठी आणि आरोपींनी दिलेले जबाब व उपलब्ध पुराव्यांची सांगड घालण्यासाठी, पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात सिया आणि चेतनची ‘पॉलीग्राफ टेस्ट’ करण्याची परवानगी मागितली आहे.
न्यायालयात ‘लास्ट सीन टुगेदर’ थिअरी मांडणार
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्यांना दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे. नसरापूर येथील भीमराव कांबळे हत्या प्रकरणात पोलिसांनी जशी ‘लास्ट सीन टुगेदर’ थिअरी न्यायालयात मांडली होती, तशीच थिअरी या लोहगड प्रकरणातही पोलीस वापरणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, “केतन जिवंत असताना शेवटचा या दोघांसोबतच दिसला होता,” हे सिद्ध करून पोलीस न्यायालयात आपली बाजू भक्कम करणार आहेत.

संबंधित बातमी वाचा…
पुणे मर्डर- सिया – चेतनचा वेगवेगळा जबाब:क्राइम पेट्रोलमधून पोलिसांना चकवा देण्यास शिकले; आता पॉलीग्राफ चाचणी होणार

पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी वेगवेगळे जबाब देत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता सत्य वदवून घेण्यासाठी पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर) चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर दोघांचे जबाब जुळवले जातील. सियाने चाचणीसाठी परवानगी दिली आहे.
तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी चेतन चौधरीने गुन्हेगारी करण्यापूर्वी ‘क्राइम पेट्रोल’ या टीव्ही मालिकेचे अनेक भाग पाहून तपास यंत्रणांना कसा चकवा देता येईल, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. येथे वाचा संपूर्ण बातमी