Headlines

अंबाडा येथील त्रिवेणी तलावात 15 दिवसाच्या मुलासह आईची आत्महत्या:वडील म्हणतात, डोक्यात ताप गेल्यामुळे ती बडबडत होती‎




मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अंबाडा येथील शंकरराव नांदणे यांची विवाहित मुलगी पूजा प्रवीण डाहे हिने १५ दिवसाच्या मुलासह गावाजवळील त्रिवेणी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असून, ती बुधवारी उघडकीस आली. मृत विवाहिता ही दर्यापूर तालुक्यातील सांगवा येथील होती. ती प्रसुतीसाठी माहेरी अंबाडा येथे आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूजा ही तापाने फणफणली होती. तिच्या वडिलांसोबत पोलिसांचा संवाद झाला, त्यावेळी त्यांना कळले की ती असंबंध बडबड करीत होती. दरम्यानच्या काळात तिचा उपचारही सुरु होता. याच परिस्थितीत ती कुणालाही काहीही न सांगता पहाटे घरातून निघून गेली. बुधवारी सकाळी ती घरात न दिसल्यामुळे मी शोधाशोध सुरु केली, असे तिचे वडील शंकरराव नांदणे यांनी पोलिसांना सांगितले. पूजाचा विवाह कोरोनाच्या काळात दर्यापूर तालुक्यातील सांगवा येथील प्रवीण डाहे नामक युवकाशी झाला होता. सुमारे १५ दिवसांपूर्वीच पूजा डाहे हिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती वडील शंकरराव नांदणे यांच्याकडे अंबाडा येथे मुक्कामी होती. बुधवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान पूजा डाहे पंधरा दिवसाचा पीयुष प्रवीण डाहेला सोबत घेऊन रात्रीच्या अंधारात त्रिवेणी तलावावर गेली आणि त्यानंतर तिने बाळासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली, असा अंदाज बांधला जात आहे. बुधवारी सकाळी शंकरराव नांदणे यांना मुलगी पूजा व बाळ घरात न दिसल्यामुळे इतरत्र शोध घेतला असता या महिलेचे शव त्रिवेणी तलावात तरंगताना आढळल्याचे त्यांना कळले. त्यानंतर मच्छीमारांच्या मदतीने पूजा डाहेचा मृतदेह बाहेर काढला. अधिक तपास मोर्शी पोलिस करीत आहे. बाळाचे शव शोधायला लागले सहा तास तलावात पूजा डाहे यांचा मृतदेह आढळून आला. मात्र बाळाचा (पीयुष डाहे) मृतदेह शोधण्यासाठी मच्छिमारांना तब्बल सहा तास तलावात शोध घ्यावा लागला. मोर्शी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतांचा पंचनामा केला. हे दोन्ही मृतदेह मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *