Headlines

महान धरणात अपेक्षितपेक्षा 70% तूट; जलसाठा आता 25 टक्क्यांवर:जलाशय परिचालन आराखड्याच्या तुलनेत चिंताजनक चित्र‎




अकोला शहरासह जिल्ह्यातील ६४ खेडी, बोरगाव मंजू, मूर्तिजापूर शहर आणि एमआयडीसी परिसराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणात यंदा पावसाळ्याचे सव्वा दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभागाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार ऑगस्टअखेर धरणात ९४ टक्क्यांहून अधिक साठा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात आजमितीला केवळ २५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये याच कालावधीत धरणात ७० टक्क्यांहून अधिक जलसाठा होता व पावसाळा अखेर धरण १०० टक्के भरले होते. मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ ते ५० टक्के साठा कमी असून नियमावलीच्या तुलनेत सुमारे ७० टक्क्यांची तूट दिसून येत आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता सुरळीत ठेवण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात सर्व दहा दरवाजांची दुरुस्ती व इतर तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दरम्यान, जऊळका रेल्वे येथील चाकातीर्थ तलाव ९० टक्क्यांपर्यंत भरल्याने मालेगाव भागातून काटा-कोंडाळा नदीद्वारे धरणात आवक वाढण्याची आशा कायम आहे. कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे आणि उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे, वैभव उगले व मनोज पाठक आवक-जावक स्थितीवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवून आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *