![]()
शहरातील गोरक्षण रोडवरील महावितरण कार्यालयाजवळ शुक्रवारी (दि. 27) रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी आकाश सुनील गवई (रा. कृषीनगर, अकोला) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींच्या तत्काळ अटकेच्या मागणीसाठ
.
खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरक्षण रोडवरील महावितरण उपकेंद्रासमोर एका अंडा भुर्जीच्या गाडीवर आकाश गवई आपल्या दोन-तीन सहकाऱ्यांसोबत अंडा भुर्जी खाण्यासाठी आला होता. त्याच वेळी तेथे एक ‘स्विफ्ट डिझायर’ कार येऊन थांबली. कारमधून तोंडाला पट्टी व रुमाल बांधलेले तीन अज्ञात हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी आकाश गवईवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी खदान पोलिस ठाण्यात ठिय्या देत आक्रमक भूमिका घेतली. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. तसेच, आमच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती, तर आकाशचा खून झाला नसता, असा आरोप त्याची आई व नातेवाइकांनी केला. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराच्या निलंबनाची मागणीही त्यांनी केली.
पोलिसांची पथके ‘ऑन ग्राउंड’ रवाना
घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपींचा व गुन्ह्यात वापरलेल्या ‘स्विफ्ट डिझायर’ कारचा शोध घेण्यासाठी डीबी (गुन्हे शोध) पथके, ठाणेदार व एलसीबीची पथके ‘ऑन ग्राउंड’ रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हा खून जुन्या वैमनस्यातून झाला की आपापसातील वादातून, याचा तपास सुरू आहे.
शरीरावर अनेक वार; हाताची बोटे कापली
हल्लेखोरांनी आकाशच्या शरीरावर व चेहऱ्यावर चाकूचे अनेक गंभीर वार केले. या भीषण हल्ल्यात त्याच्या हाताची बोटेही कापली गेली. हल्ल्यानंतर आरोपी कारसह घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.