डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात शरद पवार यांच्या भूमिकेविषयी महाराष्ट्रातील जनतेची जी भावना होती, ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला; त्यामध्ये शरद पवार आणि इतर कोणालाही दुखावण्याचा आमचा काही हेतू नव्हता, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अनेक वर्षे देशात हुकूमशाही होती; आता पुन्हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करताना दिसत आहे, ते थांबले पाहिजे. आपल्या देशात लोकशाही दीर्घकाळ नांदली पाहिजे. सत्ता कुठेही एका ठिकाणी स्थिर राहू नये, सत्ता बदलली पाहिजे. शरद पवार यातून नक्कीच समजून घेतील. त्यांनी जर लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला साथ दिली, तर इतिहासात त्यांचे फार मोठे नाव राहील; नाहीतर उद्या आपण स्वतंत्र भारतामधील गुलाम होऊ.

सरकारकडून वेळकाढूपणा करण्यात आला
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिला आरक्षणाच्या माध्यमातून डिलिमिटेशन विधेयक पारित करण्याचा प्रयत्न सुरू होता. महिला आरक्षण विधेयक संमत झाले आहे; तुम्ही हे विधेयक का लागू करत नाही, अशी काँग्रेसची मागणी होती. त्यावर सत्ताधाऱ्यांनी ‘ते 6 वर्षांनी लागू करू’ असे सांगत वेळकाढूपणा केला. अनेक राज्यांत 33 टक्के महिला आरक्षण लागू करता आले असते. सध्याच्या 543 जागांमधूनच 33 टक्के आरक्षण देण्यात यावे, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे.
लोकसभेच्या 850 जागा करण्याची गरज नाही
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिला आरक्षणाचे नाव पुढे करत लोकसभेच्या 850 जागा करण्याची गरज नाही. आसाममध्येसुद्धा मतदारसंघ असेच तोडले गेले आणि एक-एक मतदारसंघ 400 किलोमीटरचा करण्यात आला. हीच बनवाबनवी संसदेत होईल; त्यामुळे देशातील लोकशाही संपुष्टात येईल आणि 2029 नंतर पुढच्या निवडणुका होणारच नाहीत. उत्तर कोरियामध्येसुद्धा निवडणुका होतात, पण जिंकते कोण? चीन, रशियामध्ये निवडणुका होतात, पण तिथे जिंकते कोण? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. इथेसुद्धा निवडणुका होतील, पण अशी परिस्थिती निर्माण झाली तर जिंकणार कोण? हे देशातील लोकांना पूर्णपणे पटवून देण्याचे काम राहुल गांधी यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केले. डिलिमिटेशनमुळे देशाला आणि लोकशाहीला काय धोका आहे, हे त्यांनी स्पष्ट केले, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.
हे ही वृत्त वाचा
डिलिमिटेशनमुळे उत्तर-दक्षिण संघर्ष पेटणार:संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा डाव, दक्षिणेतील राज्यांवर मोठा अन्याय- राज ठाकरे

डिलिमिटेशन विधेयकामुळे देशाच्या हाताला काय लागणार आहे? संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा हा डाव आहे. यामुळे भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणमध्ये महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या सर्व राज्यांवर पुढील काळात अन्यायच होणार आणि तो दीर्घकाळ होणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर