![]()
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पित्याने स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलाची गुप्तीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली. मुलाच्या हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या पोटातही तीच गुप्ती खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला
.
दिलीप लहानू मोटे ( ३०, रा. नांद्री काळेगाव, बुलढाणा) असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी दहा वाजता दिलीप आपला मुलगा प्रेम (८) याला घेऊन मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेला. दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी त्याने भावाला फोन करून मुलावर गुप्तीने वार केल्याची धक्कादायक माहिती दिली. पत्नी व नातेवाइकांनी शिवारात धाव घेतली असता, प्रेम रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिस पाटील काकड यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी आरोपीला अकोला येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेवरून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पंचनामा केला.
तुझे अनैतिक संबंध आहेत.. तुला व मुलाला मारून स्वत: मरतो
संशयित आरोपी दिलीप लहानू मोटे हा दोन दिवसांपासून पत्नी आणि मुलासह मिर्झापूर येथे आला होता. तो सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. शनिवारी २ मे रोजी सायंकाळी त्याने पत्नीशी “तुझे कुणाशी तरी अनैतिक संबंध आहेत’, असे म्हणून वाद घातला आणि “तुला व मुलाला मारून टाकतो व स्वतःही मरतो” अशी धमकी दिली होती.