Headlines

अक्षय ऊर्जा:80 कोटींच्या 13 मेगावॅट सौर प्रकल्पातून 4 हजार शेतकऱ्यांना मिळेल दिवसा वीज!




बिबट्याची दहशत अन् रात्रीचे जागरण यामुळे रात्रीचा वीजपुरवठा शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. यापार्श्वभूमीवर ५८ एकर क्षेत्रावर ८० कोटींचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून तब्बल १३ मेगावॅट वीज उपलब्ध होणार असून, त्याचा थेट फायदा वांबोरीसह पंचक्रोशीतील ४ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत वांबोरी, मोरे वाडी, ससे गांधले वस्ती, कात्रड, कुक्कडवेढेसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची जि.प. अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अॅड. सुभाष पाटील यांनी पाहणी केली. प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वीत करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प १ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन महावितरण प्रशासनाने आखले आहे. अहिल्यानगर तालुक्यातील कोळपे आखाडा परिसरात सुमारे ५८ एकर क्षेत्रावर सौर पॅनेल उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज तीन स्वतंत्र वीजवाहिन्यांद्वारे वांबोरी उपकेंद्राला जोडली जाणार आहे. पुरवठ्याच्या स्थिरतेसाठी हा प्रकल्प वांबोरी उपकेंद्राच्या ग्रिडला जोडलेला असतो. ढगांमुळे उत्पादन घटले, तरी उर्वरित गरज ग्रिडमधून भागवता येते. सध्या रात्रपाळीचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री अवेळी शेतात जावे लागत होते. त्यातच या भागात बिबट्याचाही वावर आहे. अशा स्थितीत शेती सिंचन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या प्रकल्पामुळे दिवसा वीज शक्य ^ शेतीसाठी या भागात आपण दिवस व रात्रपाळीत वीजपुरवठा करत होतो. परंतू, शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. वांबोरीत १.६ मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यात आला होता. परंतु, वांबोरीसाठी तो पुरेसा नव्हता. परंतू, मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून नव्याने ५८ एकरात उभारलेला सुमारे ८० कोटींचा प्रकल्प १ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्याचा फायदा परिसरातील पाच गावांना होईल. विलास बडे, कक्ष अभियंता. महावितरण. सूर्यप्रकाशातून वीज कशी बनते? १३ मेगावॅट ही प्रकल्पाची कमाल क्षमता आहे, म्हणजे पूर्ण सूर्यप्रकाशात मिळणारी वीज. प्रकल्पातून वर्षाला दोन ते अडीच कोटी युनिट वीज मिळू शकते. कृषी फीडरवरील भाराच्या दृष्टीने पाहिले, तर ५ हॉर्सपॉवरचा पंप सुमारे ३.७ किलोवॅट वीज घेतो. चार हजार ग्राहकांचा एकूण जोडभार १३ मेगावॅटच्या आसपास किंवा त्याहून अधिक असू शकतो. सर्वच पंप एकाच वेळी चालत नसल्याने हा भार सांभाळता येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *