Headlines

पारनेर:दगडाचा रुद्राक्ष बनवण्याचा चमत्कार दाखवून वृद्धाची सोनसाखळी लंपास




भाळवणी येथील आठवडे बाजारात देवाचे भक्त असल्याचे सांगत चमत्कार दाखवण्याच्या बहाण्याने एका ६६ वर्षीय वृद्धाची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. दगडाचा रुद्राक्ष बनवल्याचा बनाव करून वृद्धाचा विश्वास संपादन करणाऱ्या दोन अनोळखी भामट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची साखळी हातचलाखीने लंपास केली. जयसिंग भानुदास खादंवे (वय ६६, रा. टाकळी खातगाव, नगर) यांनी याप्रकरणी गुरुवारी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भाळवणी येथे आठवडे बाजार असल्याने बुधवारी सकाळी खादंवे दुचाकीवरून बाजारासाठी आले होते. बाजारतळावर दुचाकी लावून ते भाजीपाला खरेदी करत होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. आम्ही शिर्डीचे रहिवासी असून देवाचे भक्त आहोत, असे सांगून त्यांनी खादंवे यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी जमिनीवरून एक लहान दगड उचलण्यास सांगितले. खादंवे यांनी दगड हातात घेऊन मूठ बंद केली असता भगवा टी-शर्ट घातलेल्या तरुणाने त्यांच्या बंद मुठीवर फुंकर मारली. त्यानंतर मूठ उघडण्यास सांगितले. खादंवे यांनी मूठ उघडली असता हातातील दगडाचा रुद्राक्ष झाल्याचा भास निर्माण करण्यात आला. या कथित चमत्कारामुळे खादंवे यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढण्यास सांगितली. खादंवे यांनीही विश्वासाने एक तोळा वजनाची सोन्याची साखळी काढून त्यांच्या हातात दिली. या दोघांनी साखळी ५० रुपयांच्या नोटेसह एका रुमालात बांधल्याचा बनाव केला आणि तो रुमाल खादंवे यांच्याकडे सुपूर्द केला. रुमाल खिशात ठेवा, मागे वळून पाहू नका, सरळ पुढे चालत जा आणि घरी गेल्यानंतर देवघरात रुमाल उघडा, अशा सूचना त्यांनी दिल्या. भामट्यांच्या सांगण्याप्रमाणे खादंवे काही अंतर पुढे गेले. मात्र, खिशाला हात लावताच रुमालात काहीच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी मागे वळून पाहिले; मात्र तोपर्यंत दोन्ही भामटे पसार झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *