Headlines

अजित पवारांच्या पावलावर पाऊल!:धाकट्या लेकाने बारामतीत भरवला जनता दरबार; सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार- जय पवार




राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाला संधी दिली जाणार याची चर्चा रंगली आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या जागी सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली होती. याच चर्चेत जय पवार यांच्याही नावाची चर्चा आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे आज त्यांनी जनता दरबार भरवला होता. खासदारकीच्या जागेवरून सुरू असलेल्या नावाच्या चर्चेवर जय पवार म्हणाले, चर्चा होत आहे पण मी इथेच सर्वांसाठी काम करेल, असे म्हणत त्यांनी त्यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसेच 2029 च्या निवडणुकीवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पहायचे आहे. आता वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटते 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभ्या राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे विधान पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे ही बारामतीकरांसह राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती, मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हे स्वप्न अधुरे राहिले. आता सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनून दादांची ही इच्छा पूर्ण करतील, अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाळगत आहेत. त्यातच जय पवार यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील असे स्पष्ट करतानाच, त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना आता नवे बळ मिळाले आहे. जय पवारांनी भरवला जनता दरबार जय पवार यांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपल्या विविध समस्या जय पवार यांच्यासमोर मांडल्या. जनतेच्या अडचणी समजून घेत जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला. बारामतीतील नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जय पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *