![]()
तीर्थक्षेत्र पैठणमध्ये अधिक मासानिमित्त अनेक ठिकाणी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे. माहेश्वरी भक्तनिवास येथे (२४ मे रविवार ते ३१ मे रविवार) या काळात श्रीमद् भागवत कथा होणार आहे. कथा मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज, पाथर्डी, गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. कथेनिमित्त (२४ मे) रोजी बालाजी मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष जयनारायण लोहिया, माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लखोटिया, माहेश्वरी सभेचे तालुकाध्यक्ष जगदीश नागोरी, अजय पोरवाल, गणेश लाहोटी, जुगलकिशोर लोहिया, विष्णुकांत काबरा, राज मानधने, दिनेश राठी, पुणे येथील लड्डा परिवार, मालाणी परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. शोभायात्रा सुतारपार गल्ली, भाजी मार्केट, शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खंडोबा चौक मार्गे माहेश्वरी भक्तनिवास येथील कथा स्थळापर्यंत गेली. शोभायात्रेत सर्व समाज बांधव, वारकरी संस्थेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आयोजक अशोककुमार मालाणी यांनी सांगितले की, अधिक मास दरवर्षी येत नाही. तो दर तीन वर्षांनी येतो. या पवित्र महिन्यात तीर्थक्षेत्रात भागवत कथेचे आयोजन महत्त्वाचे आहे. सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने आयोजन केले. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी सांगितले, अधिक मासात तीर्थक्षेत्रात कथा आयोजन, कथा श्रवण केल्याने मनुष्य जीवन सार्थक होते. सोमवारी सायंकाळी ५ वाजता राधाकृष्ण मूर्तीचा दक्षिण काशी पैठण येथे गंगा गोदावरी, राधाकृष्ण भेट कार्यक्रम झाला. सुशोभित होडीतून राधाकृष्ण मूर्तीची गोदावरी प्रदक्षिणा झाली. कृष्ण कमला तीर्थ येथे दीपोत्सव झाला. कथेला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन आयोजकांनी केले. आले. वारकऱ्यांनी फुगडी, पावली खेळत वाढवली शोभा खेळत वाढवली शोभा शोभायात्रेदरम्यान बसस्थानक चौकात अशोक करवा, किशोर दरक यांच्या वतीने सहभागी भाविकांना थंडगार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. महिला, पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. सुशोभित रथात ठेवलेली भगवान राधाकृष्णाची अडीच फूट पितळाची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. फटाक्यांची आतषबाजी झाली. महिला, वारकरी ठिकठिकाणी पावली, फुगड्या खेळत शोभा वाढवत होते.
Source link
अधिक मासात कथा श्रवण केल्यामुळे जीवन सार्थक होते- मुकुंद जाटदेवळेकर:पैठण येथे शोभायात्रेने श्रीमद् भागवत कथेला उत्साहात सुरूवात