![]()
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता ओंकार भोजने आणि ‘अफरातफरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक-सहनिर्माते मिलिंद झुंबर कवडे यांच्यातील वाद आता थेट कायदेशीर लढाईच्या वळणावर पोहोचला आहे. एका डिजिटल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत आपल्याविरुद्ध अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामीकारक विधाने केल्याचा आरोप करत ओंकार भोजनेने दिग्दर्शक मिलिंद कवडे यांना चक्क 50 लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीला गैरहजर राहिल्याचा आरोप करताना कवडेंनी ओंकारची तुलना ‘सराईत पाकीटमार’ आणि ‘सराईत खोटारडा’ अशा शब्दांत केल्याने मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, मिलिंद कवडे यांनीही नमते न घेता आपल्या वकील ॲड. दीपाली आर. बोहरा यांच्यामार्फत तब्बल 30 पानांचे कायदेशीर प्रत्युत्तर पाठवून 50 लाखांची मागणी व माफीनामा धुडकावून लावला असून, ओंकारवरच असहकार्याचा गंभीर पाढा वाचला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका डिजिटल मुलाखतीत अभिनेता ओंकार भोजनेवर जोरदार ताशेरे ओढले होते. मुलाखतीत बोलताना कवडेंनी ओंकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याची तुलना थेट ‘सराईत पाकीटमार’ व ‘सराईत खोटारडा’ अशी केली. या मुलाखतीचे छोटे व्हिडिओ स्निपेट्स सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाले. लाखो चाहत्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचल्यामुळे आपली व्यावसायिक आणि सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचे ओंकारचे म्हणणे आहे. ओंकार भोजनेच्या नोटिशीतील 5 महत्त्वाचे मुद्दे व खुलासे ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटिशीत ओंकारने वस्तुस्थिती मांडली आहे. ‘अफरातफरी’ सिनेमाचे चित्रीकरण नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्येच पूर्ण झाले होते. त्यानंतर निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या (आधी 3 सप्टेंबर आणि नंतर थेट 9 ऑक्टोबर 2026). ओंकारने आधीच इतर व्यावसायिक प्रोजेक्ट्ससाठी वेळ दिलेला असल्याने अचानक बदललेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे त्याला शक्य झाले नाही. सोशल मीडिया नसतानाही 130 लोकांना मेसेज स्वतःचे वैयक्तिक सोशल मीडिया खाते नसतानाही ओंकारने स्वतःच्या व्हॉट्सॲपवरील वैयक्तिक ब्रॉडकास्ट संदेशांद्वारे तब्बल 130 संपर्कांना चित्रपटाचे अधिकृत टीझर, ट्रेलर व गाणी पाठवून प्रचार केला होता. तसेच व्यस्त वेळापत्रकातून 2 मोठ्या माध्यमांना प्रत्यक्ष मुलाखतीही दिल्या होत्या. चित्रपटाचे नुकसान टाळले मुलाखतीतील अपमानास्पद वक्तव्यांमुळे प्रचंड मनस्ताप झाला असतानाही, चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक परिणाम होऊ नये म्हणून ओंकारने सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत शांत राहून ही नोटीस रोखून धरली होती. 50 लाख रुपयांची भरपाई आणि माफीची मागणी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023च्या कलम 356 (मानहानी) अंतर्गत आणि दिवाणी कायद्यानुसार मिलिंद कवडे यांनी जाहीर बिनशर्त माफी मागावी, विधाने मागे घ्यावीत आणि 50,00,000/- (पन्नास लाख रुपये) भरपाई द्यावी; अन्यथा दिवाळीनंतर दिवाणी आणि फौजदारी कोर्टात खटला चालवला जाईल, असा थेट इशारा दिला आहे. मिलिंद कवडेंचे 30 पानांचे सडेतोड उत्तर; असहकार्याचा वाचला पाढा दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ॲड. दीपाली आर. बोहरा यांच्यामार्फत 30 पानांचा कायदेशीर जबाब नोंदवून ओंकारचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी कोणतीही द्वेषभावना ठेवून विधाने केलेली नाहीत. चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या उपलब्धतेअभावी निर्माते-दिग्दर्शकांना येणाऱ्या अडचणींवर व्यावसायिक अनुभवातून ते बोललो होतो. ‘सराईत पाकीटमार’ हा शब्द केवळ एका सर्वसामान्य संदर्भाचा भाग होता, तो थेट ओंकारसाठी वापरलेला नव्हता,” असा बचाव कवडेंनी केला आहे. एआय (AI) पोस्टरची नामुष्की चित्रीकरण आणि डबिंगच्या वेळी ओंकारने सतत विलंब केल्याने पोस्ट-प्रॉडक्शनचे वेळापत्रक कोलमडले. अनेक ज्येष्ठ कलाकारांनी पोस्टर शूटसाठी वेळ दिला, पण ओंकार हजर न राहिल्याने अखेर निर्मात्यांना एआय-जनरेटेड पोस्टर रिलीज करावे लागले, ज्यावरून सोशल मीडियावर सिनेमाची प्रचंड खिल्ली उडवली गेली. चित्रपटाच्या डिजिटल प्रसिद्धीसाठी इतर सर्व कलाकारांप्रमाणे ओंकारकडे केवळ ३० सेकंदांचा साधा सेल्फी व्हिडिओ वारंवार मागितला होता, पण त्याने तो दिला नाही. पुणे दौरा ऐनवेळी रद्द 28 सप्टेंबर रोजी पुण्यात आयोजित केलेल्या पूर्वदिवसाच्या भव्य प्रसिद्धी दौऱ्यासाठी ओंकारने ऐनवेळी “मी फक्त 4 तासच उपलब्ध राहीन” असे सांगितल्यामुळे तो संपूर्ण दौराच निर्मात्यांना रद्द करावा लागला आणि मोठे आर्थिक नुकसान झाले. दिग्दर्शकाने माफी मागण्यास आणि 50 लाख रुपये देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे, आता दिवाळीनंतर हा वाद न्यायालयाच्या पायऱ्या चढणार हे निश्चित झाले असून, संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचे लक्ष या हाय-प्रोफाइल खटल्याकडे लागले आहे.
Source link
अभिनेता ओंकार भोजनेचा दिग्दर्शक मिलिंद कवडेंवर 50 लाखांचा दावा:कोर्टात खेचण्याचा इशारा; 30 पानांच्या उत्तरातून कवडेंचाही पलटवार