![]()
अमरावतीत शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ अंतर्गत कार्यशाळा होणार आहे. ‘दुष्काळावर मात आणि संकल्प समृद्ध गावाचा’ हा कार्यशाळेचा विषय आहे. केंद्रीय आणि राज्यातील १० मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजने’चे विभागस्तरीय पुरस्कारही दिले जातील. जिल्हा परिषदेचे सर्व विभाग कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या नेतृत्वात बैठका सुरू आहेत. कार्यशाळा कठोरा रोडवरील पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे होईल. राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहतील. राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके आणि उद्योग व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचाही समावेश आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी या कार्यशाळेचे यजमान आहेत. अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागस्तरीय ग्रामपंचायती आणि अमरावती जिल्ह्यात जिल्हास्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले जातील. २०२६-२७ मधील अभियानाची अंमलबजावणी, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवणे आणि गावांतील विकासकामांना गती देणे, यावर कार्यशाळेत मार्गदर्शन होईल. लोकसहभागातून शाश्वत ग्रामविकास साधण्यावरही चर्चा होणार आहे. जलसंधारण, पाण्याचे नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि लोकसहभाग या विषयांवर विचारांची देवाणघेवाण होईल. ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या माध्यमातून सक्षम व स्वयंपूर्ण गावे उभारण्यावरही चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे आणि अमर काळे उपस्थित राहतील. विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे, धीरज लिंगाडे, बच्चू कडू, किरण सरनाईक आणि संजय खोडके यांचीही उपस्थिती राहणार आहे. विधानसभा सदस्य सुलभा संजय खोडके, केवलराम काळे, राजेश वानखडे, रवि राणा, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर आणि गजानन लवटे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यशाळेतून दुष्काळावर मात करण्याचे सूत्र मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
Source link
अमरावतीत 10 मंत्री पंचायतराज कार्यशाळेला उपस्थित राहणार:दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाच्या विषयावर उद्या कार्यक्रम; ग्रामपंचायतींना पुरस्कार देणार