![]()
अमरावतीहून अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ११ दिवसांची विशेष तीर्थयात्रा सुरू केली आहे. भाविकांना साधी लालपरी किंवा स्लीपर बसने प्रवास करता येईल. साध्या बससाठी किमान ४० प्रवाशांचा, तर स्लीपर बससाठी ३० प्रवाशांचा गट आवश्यक आहे. गटाच्या मागणीनुसार एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. अयोध्येसह मार्गावरील इतर धार्मिक स्थळांनाही भेट देता येईल. यात्रेचा मार्ग अमरावती-झाशी-वाराणसी-प्रयागराज-अयोध्या असा असेल. परतीचा प्रवासही याच नियोजनानुसार होईल. प्रवासात साधारण १० ठिकाणी मुक्काम असेल आणि एकूण अंतर अंदाजे २ हजार ८०० किलोमीटर आहे. मुक्कामाची व्यवस्था महामंडळ करेल. प्रवाशांच्या मागणीनुसार मार्ग आणि नियोजनात बदल करता येईल. प्रत्येक प्रवाशाचा १० लाख रुपयांचा विमा काढला जाईल. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे बस परमिट महामंडळ काढून देईल. मात्र, प्रवासी कर आणि पार्किंगचा खर्च प्रवाशांना करावा लागेल. यात्रेचे भाडे बसने केलेल्या एकूण प्रवासाच्या किलोमीटरनुसार ठरेल. बसमधील मीटरनुसार अंतिम भाडे निश्चित करून बिल दिले जाईल. बुकिंगसाठी एकूण भाड्याच्या २० टक्के रक्कम आगाऊ जमा करावी लागेल. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी अमरावती जिल्ह्यातील अमरावती-१, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, मोर्शी आणि वरूड एसटी बस आगारांशी संपर्क साधा. अमरावती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले की, खासगी आराम बसच्या तुलनेत कमी दरात ही यात्रा करता येईल. महामंडळाचे चालक अनुभवी आणि प्रशिक्षित आहेत. भाविकांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून दिली जाईल.
Source link
एसटीने अयोध्येसाठी 11 दिवसांची यात्रा सुरू केली:40 जणांचा गट आवश्यक; स्लीपर बससाठी 30 प्रवासी, 2800 किमीचा प्रवास