Headlines

आंदोलन:त्या ‘’ प्रकरणाचा व्हिडीओ काढणाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्शीकरांचा उत्स्फुर्त बंद




येथील नगरपरिषद कार्यालयातील मांसाहारी पार्टीचा व्हिडीओ काढणाऱ्या युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज, गुरुवारी येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मोर्शीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी या बंदची हाक दिली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी सकाळपासूनच येथील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. आंदोलनाच्या प्रारंभी स्थानिक जयस्तंभ चौक येथील गणपती मंदिरासमोर कार्यकर्त्यांच्या जमावाने प्राणघातक हल्ला करणाऱ्यांचा निषेध असो, गुन्हेगाराला तात्काळ अटक झालीच पाहिजे, मुख्याधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आदी गगनभेदी घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस स्टेशनवर जाऊन धडकले. त्या ठिकाणी काही काळ ठिय्या आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची व या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराची कसून चौकशीची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली. आजच्या बंद व ठिय्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष कैलास फंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष मोहन श्रीवास, माजी नगरसेवक विजय कोकाटे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विपुल भडांगे, उबाठा शिवसेना पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख उमेश शहाणे, मनसेचे नितीन लुंगे, संदीप रोडे, निलेश रोडे, नितीन उमाळे, नगरसेवक हर्षल चौधरी, नितीन पन्नासे, ब्रह्मानंद देशमुख, अजय आगरकर, भास्कर फंदे, घनश्याम शिंगरवाडे, शिवहरी फंदे, नितीन राऊत, अमोल फंदे, बाबाराव जाधव, अनिकेत राऊत, केशवराव पांडे, रावसाहेब अढाऊ, शेखर गावंडे, पप्पू वानखडे ,सुधाकर अकर्ते, रवी मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. काय आहे नेमके प्रकरण ? नगरपालिका इमारतीच्या छतावर शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी मांसाहारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेचे व्हिडीओ चित्रण करणाऱ्या प्रशांत कॉलनी येथील रमाकांत गावंडे यांचे १७ नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले. गावंडे यावेळी नशीतपूर येथील शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. दरम्यान ते गाडीतून उतरून शेताच्या दिशेने जात असतानाच त्यांना उचलून नशीरपूर फाट्यानजीक आणून त्यांच्यावर नऊ जणांनी प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी रमाकांत गावंडे यांना त्यानंतर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांचा उपचार अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात सुरू आहे. याबाबतची फिर्याद मोर्शी पोलिसात दाखल केल्यानंतर मोर्शी पोलिसांनी फरार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. त्यांना जेरबंद करण्यासाठी सहा पथके गठित करण्यात आल्याचे ठाणेदार राहुल आठवले यांचे म्हणणे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *