![]()
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी मठ, धनकवडी येथील प्रसाद वाटप व्यवस्था नियमितपणे सुरू असून, मठाच्या स्वयंपाकघराची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या नाहीत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी आणि सचिव श्री. सतीश कोकाटे यांनी दिली. श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट (ए-७९३) यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा रीतसर अधिकृत परवाना आहे. शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त एफडीए, पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समाधी मठातील अद्ययावत स्वयंपाकघराची तसेच प्रसाद वाटप व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीदरम्यान कोणत्याही त्रुटी निदर्शनास आल्या नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले. दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांवर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या या समाधी मठाच्या बाहेरील अनधिकृत शंकर महाराज अन्नछत्र समिती संदर्भातील आहेत. या समितीचा श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठाशी अथवा समाधी ट्रस्टशी कोणताही संबंध नाही, असे विश्वस्त मंडळाने जाहीर निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. संबंधित कारवाईच्या बातम्यांमुळे समाधी ट्रस्टबाबत भाविकांमध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये किंवा दिशाभूल होऊ नये, असे आवाहनही विश्वस्त मंडळाने केले आहे. समाधी मठातील प्रसाद वाटपाची व्यवस्था नेहमीप्रमाणे नियमितपणे सुरू असल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी, सचिव सतीश कोकाटे, तसेच विश्वस्त सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, निलेश मालपाणी आणि प्रताप भोसले यांनी भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
Source link
एफडीए तपासणीत मठाच्या स्वयंपाकघरात त्रुटी नाही:अनधिकृत अन्नछत्र समितीशी संबंध नसल्याचे शंकर महाराज समाधी ट्रस्टचे स्पष्टीकरण