![]()
राज्यात यंदा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे खासगी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी सुरू असलेल्या तगाद्याचे प्रकार समोर येत आहेत. सरकारकडून सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालण्याचे निर्देश दिले जात असतानाही काही वसुली एजंटांकडून कर्जदारांना त्रास दिला जात असल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे तर कर्जवसुलीचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेकडे कर्जाच्या हप्त्यांची मागणी करण्यासाठी खासगी बँकेचा वसुली कर्मचारी थेट रुग्णालयात पोहोचला. या घटनेमुळे कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेल्या मनमानी कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मूर्तिजापूर येथील वैशाली गोपाल इंगळे या महिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना विश्रांती आणि उपचारांची गरज असताना खासगी बँकेचा वसुली कर्मचारी थेट रुग्णालयात पोहोचला. त्याने रुग्णालयात दाखल असलेल्या वैशाली इंगळे यांच्याकडे कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावल्याचा आरोप आहे. आजारपणामुळे महिला रुग्णालयात उपचार घेत असतानाही वसुली कर्मचाऱ्याने त्यांची परिस्थिती लक्षात न घेता पैशांची मागणी केल्याने या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे एक पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी संबंधित वसुली कर्मचाऱ्याला जाब विचारत त्याच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेकडे अशा पद्धतीने कर्जवसुलीचा तगादा लावणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरण्यात आले. त्यानंतर वसुली कर्मचारी तेथून निघून गेला. दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात राज्यात यंदा अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसातील अनियमितता, पिकांचे नुकसान आणि शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असताना कर्जाचे हप्ते भरण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जनावरांसाठी चारा आणि इतर मदतीची व्यवस्था करण्याबरोबरच अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे, कर्जाची परतफेड वेळेत होत नसल्याने बँका आणि खासगी वित्तीय संस्थांकडून कर्जदारांकडे वसुलीसाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र, वसुली करताना कर्जदारांची आर्थिक परिस्थिती, अडचणी आणि मानवी संवेदनशीलता लक्षात घेणे अपेक्षित आहे. विशेषतः आजारी व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असताना तिच्याकडे अशा प्रकारे पैशांची मागणी करणे हा गंभीर प्रश्न ठरत आहे. सरकारच्या इशाऱ्याचा वसुली एजंटांवर परिणाम होणार कधी? मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. कर्जाच्या हप्त्यांसाठी दबाव टाकणे, वारंवार संपर्क साधणे आणि कर्जदारांना मानसिक त्रास देणे अशा प्रकारांमुळे अनेक कुटुंबे अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, मूर्तिजापूरमधील घटनेमुळे सरकारी निर्देशांचा वसुली कर्मचाऱ्यांवर कितपत परिणाम होत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे सरकारकडून शेतकरी आणि आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे प्रत्यक्षात कर्जवसुलीच्या नावाखाली अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेलाही कर्जवसुलीच्या तगाद्यापासून सुटका मिळत नसेल, तर सर्वसामान्य कर्जदारांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्जवसुलीच्या पद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने सक्तीच्या वसुलीविरोधात दिलेले निर्देश केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का, तसेच संबंधित वित्तीय संस्थांवर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा… राज्यातील आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित:शेतकऱ्यांना दिलासा, कर्जवसुलीला स्थगिती अन् वीजबिलात सवलत राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. आता त्यामध्ये आणखी 6 तालुक्यांची भर पडली आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील सहा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित तालुक्यांतील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. सविस्तर वाचा…..
Source link
रुग्णालयात दाखल महिलेकडेही कर्जवसुलीचा तगादा:एजंट थेट रुग्णालयात पोहोचला, सरकारचे आदेश धाब्यावर!