![]()
पुण्यातील पत्रकार परिषदेत शिरगावच्या श्री साईबाबा ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहारांबाबत विश्वस्तांवर आरोप करण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक आणि तहहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख यांनी रवी जाधव, उमेश कविटकर आणि त्यांच्या साथीदारांवर कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेख यांच्या आरोपानुसार, दानपेटीतील देणगीच्या रकमेची अफरातफर, बनावट ठराव आणि कागदपत्रांमध्ये फेरफार तसेच आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. पोलीस प्रशासनातील काही अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने हे प्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. गुरुवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला उस्मान दगडू शेख, तहहयात विश्वस्त समीर शेख, ॲड. अनघा कुलकर्णी, अक्षय धावरे, रामभाऊ गोपाळे आणि शिरगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. समीर शेख यांनी सांगितले की, श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संलग्न श्री साईबाबा अन्नछत्र मंडळाची सार्वजनिक न्यास म्हणून पुणे येथील सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालयात ९ सप्टेंबर २००२ रोजी नोंदणी झाली. ट्रस्टचा नोंदणी क्रमांक इ/३६७४/पुणे आहे. ट्रस्टमध्ये एकूण सात विश्वस्त होते. तत्कालीन आमदार प्रकाश देवळे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत प्रसाद दत्तात्रय पाटील, प्रमोद माणिक शेठ दुगड, धोंडीराम बाबा चव्हाण, उस्मान दगडू शेठ, दिगंबर शेठ बाळासाहेब भेगडे आणि प्रा. नारायण सदाशिव फरांदे विश्वस्त होते. प्रकाश देवळे यांचे २४ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक रवी जाधव आणि उमेश कविटकर यांची विश्वस्त म्हणून नोंद करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सध्याच्या विश्वस्तांना विश्वासात न घेता बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप समीर शेख यांनी केला. मंदिरात पुणे-मुंबईसह देश-विदेशातून साईभक्त येतात. ते नवस बोलण्यासाठी आणि संकल्प सोडण्यासाठी सोने, चांदी, हिरे तसेच रोख रक्कम दान करतात. दरमहा लाखो रुपये जमा होतात, मात्र त्यातील ठराविक रक्कमच ट्रस्टच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि उर्वरित रक्कम वैयक्तिक कामांसाठी वापरली जात असल्याचा संशय असल्याचे शेख यांनी सांगितले. दानपेटी बेकायदेशीरपणे फोडून रोख रकमेचा अपहार केल्याचा आरोपही त्यांनी केला. बँकेत जमा केलेल्या रकमेतील नोटांचा तपशील जुळत नसल्याचे आणि तक्रार केल्यानंतर दानपेटीतील नोटांच्या तपशिलाचे बनावट कागद तयार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे कागद एकाच दिवशी, एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरात लिहिले असल्याचा आरोप असून त्याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
Source link
ट्रस्टच्या पैशांच्या गैरव्यवहाराचा विश्वस्तांवर आरोप:उस्मान शेख यांची कारवाईची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार