![]()
पुणे पोलिसांनी एका अमली पदार्थ तस्कर महिलेवर ‘पीआयटी-एनडीपीएस’ कायद्यानुसार कठोर कारवाई केली आहे. या महिलेला वर्षभरासाठी कोल्हापूरच्या कळंब मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. वेळोवेळी कारवाई करूनही तिच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. रिना रवी गुमाने (वय 32) असे या महिलेचे नाव आहे. मुंढवा पोलिसांनी 2022 मध्ये तिच्याविरुद्ध अमली पदार्थ तस्करी आणि विक्री प्रकरणात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रिनाने 8 ऑगस्ट 2022 रोजी पुण्यातील सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवला होता. जामीन मिळाल्यानंतरही तिने पुन्हा अमली पदार्थ विक्री सुरू केली. त्यामुळे मुंढवा पोलिसांनी गेल्या 19 मे रोजी तिच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातही तिने अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटी व शर्तींवर जामीन मिळवला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही रिनाच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. ती पुन्हा अमली पदार्थ विक्री आणि तस्करीमध्ये सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. रिनाला वर्षभरासाठी ‘पीआयटी-एनडीपीएस’ कायद्यानुसार कारागृहात स्थानबद्ध करण्याची शिफारस या प्रस्तावात होती. पोलीस महासंचालकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त जीवन बेनीवाल आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनीक, गुन्हे शाखेचे निरीक्षक सागर गोडे, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, केतकी चव्हाण, प्रमोद काळे, संभाजी शितोळे, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर, तेजस जगदाळे, रुपेश महामुनकर, सारिका पखाले, विशाल बनकर, ऋषीकेश टिळेकर आणि अक्षय जराड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Source link
अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध:पीआयटी-एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार कठोर कारवाई