![]()
राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप पिकांवर परिणाम होत असून, दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध स्तरांवर आढावा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, अशाच एका बैठकीत काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दृश्य समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात रविवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अमरावती विभागातील आठ जिल्हे आणि 56 तालुक्यांमधील परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पिकांची स्थिती, पावसाचे प्रमाण आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके, इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. तसेच अमरावती विभागातील विविध पक्षांचे खासदार आणि आमदारही उपस्थित होते. चर्चा दुष्काळावर, मात्र काही अधिकारी मोबाईलमध्ये बैठकीत लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधत असताना काही अधिकारी मात्र मोबाईलचा वापर करताना दिसल्याचे समोर आले आहे. काही जण सोशल मीडिया पाहत असल्याचे, तर काही जण व्हॉट्सॲपवर व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे दुष्काळासारख्या गंभीर विषयावरील बैठकीत अधिकारी किती गांभीर्याने सहभागी झाले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून अनेक भागांत पिकांवर संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित असते. त्यामुळे बैठकीदरम्यान मोबाईल वापरण्याच्या प्रकारावरून आता नाराजी व्यक्त केली जात आहे. नांदेडच्या काजू-बदाम प्रकरणानंतर पुन्हा चर्चेला उधाण नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत मंत्री आणि नेते काजू-बदाम खात असल्याचे दृश्य समोर आल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आता अकोल्यातील दुष्काळ आढावा बैठकीतील अधिकाऱ्यांच्या मोबाईल वापराचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. कृषिमंत्र्यांकडून चौकशीचे संकेत या प्रकाराची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती घेऊन आवश्यक कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. काँग्रेस आमदार अमित झनक यांनीही बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांचे मोबाईलमध्ये व्यस्त राहणे निंदनीय असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अनेक भागांत पिकांना पाण्याची गरज असताना पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत दुष्काळ आढावा बैठकीत झालेल्या या प्रकारामुळे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने पाहिले जात आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा…. ‘दिशा सालियान प्रकरणात तपास यंत्रणा सत्य बाहेर आणतील’:छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया; कुंभमेळ्यावरही दिली प्रतिक्रिया दिशा सालियान प्रकरणावरून राज्यातील अनेक नेते प्रतिक्रिया देत असून, तिचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. सध्या सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून काहींनी थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींवर भाष्य करताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून चौकशी करणाऱ्या संस्था त्यातील सत्य नक्कीच बाहेर आणतील. सविस्तर वाचा..
Source link
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त:काजू-बदाम प्रकरणानंतर पुन्हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह