Headlines

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार खटला: डॉ. गोऱ्हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार:खटला जलद गतीने चालवण्यासाठी 'झिरो टॉलरन्स' धोरणाची मागणी करणार




नागपुरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि अपहरण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. या खटल्याची जलद गतीने सुनावणी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यात ‘झिरो टॉलरन्स आणि झिरो डिले’ हे धोरण राबवण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. नसरापूर येथील खटल्याच्या धर्तीवर या प्रकरणाची जलद सुनावणी व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपी निर्भय उर्फ आकाश पाखरे याला स्थानिक न्यायालयाने केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी तीव्र खंत व्यक्त केली. आरोपीची वैद्यकीय चाचणी आणि डीएनए अहवाल येण्यापूर्वीच त्याच्यासाठी निष्णात वकील उभे राहणे संशयास्पद आहे. यामागे मोठे षड्यंत्र किंवा आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आरोपीने या कृत्याची छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढून इतरांना पाठवल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले असतील, त्या सर्वांना सह-आरोपी केले जावे, अशी मागणी त्यांनी केली. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी विकृत आणि गुन्हेगारी साहित्याची जबाबदारी झटकू नये, असे ताशेरेही त्यांनी ओढले. राज्यात वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत, पीडित कुटुंबाला पूर्ण कायदेशीर आणि मानसिक आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *