![]()
गणित हा विषय गुंतागुंतीचा असला तरी तो रंजन करणारा आणि ज्ञान देणारा (अंजन घालणारा) असू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. डॉ. बीना लिमकर लिखित ‘द सिक्रेट लाईफ ऑफ फंक्शन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सीगल प्रकाशनातर्फे आयोजित या कार्यक्रमात डॉ. गोडबोले यांच्यासह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनय वैद्य, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद लेले, प्राचार्या वृषाली सहस्त्रबुद्धे आणि लेखिका डॉ. बीना लिमकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. गोडबोले म्हणाले की, गणिताचा पाया अनेक विद्याशाखांच्या मुळाशी आहे. गणितात गोष्टी, गद्य-पद्य, कोडी आणि खेळ असू शकतात, जे रंजन करणारे ठरतात. फक्त त्याची मांडणी योग्य शैलीत व्हावी लागते. बीना लिमकर यांनी गणित हा विषय अतिशय सोप्या, सहज आणि नेमकेपणाने मांडला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते अभियांत्रिकी पदवीधरांपर्यंत प्रत्येकाला आवडेल आणि समजेल, अशा पद्धतीचे उत्तम लेखन लिमकर यांनी केले आहे. त्यांच्या या लेखनामुळे विद्यार्थ्यांची गणिताची आवड वाढेल आणि त्याविषयीची भीती कमी होईल, असा विश्वास डॉ. गोडबोले यांनी व्यक्त केला. डॉ. गोडबोले यांनी जागतिक आणि भारतीय स्तरावरील आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त आणि रामानुजम यांसारख्या अनेक गणितज्ञ, शास्त्रज्ञ व संशोधकांची उदाहरणे आणि किस्से सांगून गणिताचे महत्त्व स्पष्ट केले. हे पुस्तक वाचकाला गणिताशी गोष्टीरूपात संवाद साधून जोडते, असे ते म्हणाले. पुस्तकाची निर्मितीही अतिशय देखणी असून, उत्कृष्ट इलस्ट्रेशन्स, डायग्राम्स आणि स्केचेस वापरून रिलेशन्स, फंक्शन्स यांसारख्या महत्त्वाच्या गणितीय प्रक्रिया उलगडल्या आहेत. यामुळे पुस्तकाची गुणवत्ता आणि वाचनीयता वाढली आहे, असेही डॉ. गोडबोले यांनी नमूद केले. यावेळी डॉ. विनय वैद्य यांनी डॉ. बीना लिमकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. त्या अभियांत्रिकीतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ असून, त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन दशके त्यांनी महत्त्वपूर्ण पदांवर योगदान दिले आहे. डॉ. वैद्य पुढे म्हणाले की, डॉ. बीना उत्तम सतार वाजवतात, त्या उत्कृष्ट शिक्षिका, संशोधक आहेत आणि आता त्यांनी उत्तम लेखिका असल्याचेही सिद्ध केले आहे. त्यांचे हे कार्य सर्वार्थाने आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. चांगला शिक्षक म्हणजे केवळ उच्च प्रतीचे शिक्षण घेतलेला व्यक्ती नव्हे, तर जो विद्यार्थ्यांचे उत्तम मनोरंजनही करण्याची क्षमता बाळगतो, तो उत्तम शिक्षक असतो, असे मी मानतो. डॉ. बीना या अशाच उत्तम शिक्षिका आहेत, याचा मला आनंद वाटतो, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
Source link
बीना लिमकर यांच्या 'फंक्शन्स' पुस्तकाचे प्रकाशन:गणित रंजन करते, अंजनही घालते – अच्युत गोडबोले