Headlines

अहिराणी ही समृद्ध आणि वैभवशाली भाषा:सटाणा महाविद्यालयात डॉ. पाटील यांचे प्रतिपादन; गुणवंतांसह प्राध्यापकांचा सत्कार‎




देशातील विविध बोलीभाषांमध्ये अहिराणी ही समृद्ध व वैभवशाली भाषा असून, विचार व भावनांच्या अभिव्यक्तीसाठी तिच्यात शब्दांची मोठी समृद्धी आहे, असे प्रतिपादन खान्देशरत्न व दुसऱ्या अहिराणी विश्व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी केले. मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज दिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी अध्यक्षस्थानी होते. महिला संचालिका शालन सोनवणे, प्राचार्य अनिल पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भिका सोनवणे व माजी प्राचार्य शांताराम गुंजाळ उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. पाटील यांनी अहिराणी भाषेतील विविध कविता सादर करून भाषेचे वैभव उलगडले. प्रारंभी प्राचार्य अनिल पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविकातून त्यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्षीय मनोगतात दिलीप दळवी यांनी मविप्र संस्थेच्या स्थापनेत योगदान देणाऱ्या कर्मवीरांच्या कार्याचा आढावा घेत प्रत्येक समाजघटकाने संस्थेच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यापीठ व उच्च माध्यमिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी तसेच विविध क्रीडा प्रकारांत यश मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पीएच.डी. पदवी प्राप्त प्रा. डॉ. प्रकाश गवळी, डॉ. तृप्ती काकुळते, डॉ. योगिनी साळुंके व डॉ. पंकजा देशमुख यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य नरेंद्र निकम, राजेंद्र वसईत आदींसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रिया आंबेकर व प्रा. वंदना पाटील यांनी केले, तर आभार प्रा. नीलेश पाटील यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते चार पुस्तकांचे प्रकाशन समाज दिन कार्यक्रमात प्रा. विनायक शिवदे व प्रा. संतोष आढाव लिखित ‘डिजिटल अर्थव्यवस्था’, डॉ. कृष्णा पाडवी लिखित ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’, प्रा. प्रकाश गवळी लिखित ‘भारतीय बँकिंग व्यवस्था’ तसेच डॉ. निवृत्ती राठोड लिखित चरित्रग्रंथाचे डॉ. एस. के. पाटील, महिला संचालिका शालन सोनवणे, प्राचार्य अनिल पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *