Headlines

आजपासून एसटीची स्वच्छतागृहे मोफत:बसस्थानके चकाचक आणि प्रवासही होणार सुखकर; 78 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मोहीम




राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या 78व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज, 1 जूनपासून विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येत असून, त्याअंतर्गत यंदा 78 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच प्रवाशांना एसटीच्या सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. मात्र या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने आधीच, म्हणजेच 15 एप्रिलपासून प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा अधिभार लागू केलेला आहे. अधिकचे भाडेवाढ करूनही एसटी बसस्थानक तसेच आगारातील स्वच्छतागृहे स्वच्छ नसल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. इतकेच नव्हे तर स्थानक-आगार परिसरातील अस्वच्छता आणि पाणपोईंची दुरवस्था पाहायला मिळते. यामुळे प्रवाशांनी एसटीकडे नाक मुरडण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी महामंडळाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानक आणि आगार परिसराची दर चार तासांनी स्वच्छता, पाणपोई सुरू करणे तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिवहनमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वीच केली होती घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार, स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी असलेली खासगी कंत्राटदारी व्यवस्था आता बंद करण्यात आली आहे. पूर्वी कंत्राटदारांकडे जबाबदारी असूनही अस्वच्छतेच्या तक्रारी कायम येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, आता स्वच्छतागृहांची देखभाल आणि सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी पूर्णपणे एसटी महामंडळाने स्वतःकडे घेतल्यामुळे राज्यातील सर्व आगारांमध्ये प्रवाशांना एकसमान आणि उत्तम सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटी महामंडळाला 78 वर्षे पूर्ण राज्यात 1 जून रोजी एसटी महामंडळाचा वर्धापनदिन साजरा केला जातो. 1 जून 1948 रोजी पुण्यातून पहिल्या लालपरीने धावायला सुरुवात केली होती. यंदा एसटी महामंडळाला 78 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हे विशेष उपक्रम राबवण्यात येत असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 8000 नव्या बसेसदेखील दाखल होणार आहेत. सुखकर एसटी प्रवासाचा लाभ घेता येणार प्रशासनाच्या या नव्या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवासादरम्यान होणारा अतिरिक्त खर्च वाचणार असून, स्वच्छतागृहांमधील सुविधा आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासोबतच प्रवाशांना स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे यासाठी प्रमुख बसस्थानकांवर मोफत पिण्याच्या पाण्याची स्थानके उभारण्याची महामंडळाची योजना आहे. या सर्व सोयी-सुविधांमुळे प्रवाशांना आता कमीत कमी खर्चात अधिक आरामदायी आणि सुखकर एसटी प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *