Headlines

आत्मबुद्धी जागृत करण्यासाठी अखंड नामस्मरण आवश्यक:हभप गंगाधर महाराज झाडे यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाची सांगता‎




“परमेश्वराचा अंश प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. मात्र त्या परमसत्याची जाणीव करून घेण्याची बुद्धी केवळ मनुष्याला लाभली आहे. जीव हा मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही सहज आणि शाश्वत मार्ग नाही. देह, अहंकार, मोह आणि मायेच्या पाशात अडकलेल्या मनाला मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंताच्या नामात आहे. देहबुद्धीचा विसर पडून आत्मबुद्धी जागृत व्हावी, यासाठी अखंड नामस्मरण आवश्यक आहे. ज्या क्षणी मनुष्याच्या मुखी आणि अंतःकरणात भगवंताचे नाम अखंड वास करू लागते, त्या क्षणापासून त्याच्या जीवनातील दुःख, चिंता आणि अस्थिरता दूर होऊ लागते, असे प्रतिपादन हभप गंगाधर महाराज झाडे यांनी केले. शीलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाच्या भक्तिमय कार्यक्रमाने करण्यात आली. याप्रसंगी हभप गंगाधर महाराज झाडे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. मंदिर परिसरात अखंड हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता. ते पुढे म्हणाले, “गुरु हा केवळ व्यक्ती नसून तो ज्ञानाचा अखंड प्रवाह आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुकृपेशिवाय नामाची गोडी लागत नाही आणि नामाशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस बाह्य सुखांच्या मागे धावत आहे; मात्र अंतःकरणातील शांतता त्याला सापडत नाही. ही शांतता मिळवायची असेल तर संतांनी दाखविलेल्या नामभक्तीच्या मार्गाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. संतांच्या विचारांचे आचरण, सत्संग, हरिपाठ, कीर्तन आणि भागवत श्रवण यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. यावेळी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ग्रंथांचे पारायण आणि वाचन सोहळाही मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने आणि पारंपरिक पद्धतीने काला फोडून करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार सुंदरदास रिंगणे यांनी मानले. सोहळ्यास भाविकांची जमली मांदियाळी या अखंड हरिनाम सप्ताहात श्रीमद् भागवत कथेचे निरूपण हभप धनंजय महाराज क्षीरसागर यांनी केले. त्यांनी भागवत धर्माचे महत्त्व, भक्तीमार्गाची परंपरा आणि संत साहित्याचा जीवनावर होणारा परिणाम यांचे विवेचन केले. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *