![]()
कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘विठ्ठल… विठ्ठल…’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला सर्वोच्च स्थान असून विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंचे महत्त्व लहानपणापासूनच रुजावे तसेच गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेपासून बालदिंडीला उत्साहात प्रारंभ झाला. दिंडी परिसरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचली. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. या दिंडीत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. चिमुकल्यांचा निरागस उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दिंडीमुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, भक्ती, गुरु-शिष्य नाते आणि भारतीय संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
Source link
टाळ-मृदंगाचा निनाद अन् विठूनामाचा गजर:गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडी सोहळा!