राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, पीक विम्याचा गोंधळ आणि रखडलेली नोकरभरती यांसारख्या विविध ज्वलंत प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
.
मराठवाडा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘काजू-बदाम’ खाण्याच्या वक्तव्याचा समाचार घेत, सत्ताधाऱ्यांचा ‘अहंकाराचा माज’ उतरवण्याची वेळ आल्याचा घणाघात केला. तसेच, २४ तारखेला बीडमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि २६ तारखेला पुण्यात MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठ्या आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे.
हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि चारा छावण्यांची मागणी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य मांडताना रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये ३०-३५ टक्के पाऊस कमी झाला आहे. मराठवाड्यात तर ५०-५५ टक्के पावसाची तूट आहे. राज्यातील २८० तालुक्यांमध्ये पाऊस कमी असल्याने खरीप पीक पूर्णपणे हातातून गेले आहे आणि रब्बीचा प्रश्नच उरलेला नाही. याच वस्तुस्थितीच्या आधारावर आदरणीय शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.”
यावेळी त्यांनी पीक विम्याच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले. “यंदा ४ जाचक ट्रिगर लावल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. हे ट्रिगर नसते तर आतापर्यंत २५% ॲडव्हान्स म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला १० हजार रुपये मिळाले असते. जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची लोकांची मागणी आहे,” असे पवार यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकच्या धर्तीवर विशेष अधिवेशन बोलवा
दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. “कर्नाटकात दुष्काळावर स्पेशल अधिवेशन घेतले जाते, मग महाराष्ट्रात का नाही? सरकारने शब्दांचा खेळ थांबवावा. ऑक्टोबरमध्ये मदत देणार म्हणजे तेव्हा कुठला वेगळा मुहूर्त आहे का? लवकरात लवकर मदत जाहीर न झाल्यास २४ तारखेला बीडमध्ये भव्य आंदोलन करणार असून, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरेल,” असा इशारा त्यांनी दिला.
‘काजू-बदाम’वरून सत्ताधाऱ्यांना सुनावले
सत्ताधारी नेत्यांकडून काजू-बदामाबाबत आलेल्या वक्तव्यांचा रोहित पवारांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “तुम्हाला जे खायचे ते खा. पण तुमच्या हातात अधिकार असताना तुम्ही पहिले निर्णय घेऊन मदत लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला आणि मजुराला किराणा आणायला पैसे नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी काजू-बदाम खाण्याच्या बाता करत आहेत. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराशी सत्ताधारी खासदार अत्यंत अहंकाराने बोलत होते. आता हा अहंकाराचा माज उतरवण्याची वेळ आली आहे.”
MPSC अध्यक्षांना घरी बसवा; २६ ला पुण्यात आंदोलन
कंत्राटी भरती आणि MPSC च्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. शासकीय भरतीच्या समितीवर आक्षेप घेत ते म्हणाले की, या समित्यांमध्ये ठराविक लोकांनाच ‘बाय इन्विटेशन’ बोलावले जाते. त्यांनी तयार केलेले अहवाल आधी विद्यार्थ्यांना दाखवावेत आणि त्यांना योग्य वाटले तरच स्वीकारावेत.
MPSC च्या प्रश्नांवर लक्ष वेधताना त्यांनी २६ तारखेला पुण्यात होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. “MPSC चे जे अध्यक्ष विद्यार्थ्यांना विचारून निर्णय घेत नाहीत, त्यांना घरी बसवा आणि नवीन अध्यक्ष आणा. परीक्षांसाठी हजार रुपये फी घेण्याऐवजी १०० रुपये सरसकट फी घ्या. तसेच, सरकारने घोषित केलेली ७० हजार लोकांची मेगाभरती अद्याप सुरू झालेली नाही, ती तत्काळ सुरू करा, या मागण्यांसाठी आम्ही पुण्यात रस्त्यावर उतरणार आहोत,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. रोहित पवार एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
—————
हेही वाचा..
जोगेश्वरीत विसर्जन कुंडात वीजप्रवाह पसरल्याने तरुणाचा मृत्यू:लालबाग परिसरातही गणेश मंडपाजवळ विजेचा धक्का लागून मुलगी आणि महिलेचा जीव गेला होता

मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात आणखी एका व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याची घटना समोर आली. ही घटना लिली व्हाइट इमारतीजवळील श्यामनगर तलावात दुपारी 12:20 वाजता घडली. येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी 5 कृत्रिम कुंड तयार करण्यात आले होते. त्यापैकी 4 कुंड मध्यरात्रीनंतर बंद करण्यात आले होते. सविस्तर वाचा