![]()
मराठवाड्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. पिकांना पाणी देण्यापासून जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यापर्यंत शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. अशातच बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यावर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. सातेफळ येथे शेतातील विद्युत तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा तब्बल 5 एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकरी संजीवन कांदे यांच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या, क्षणात आगीने घेतले रौद्ररूप मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील शेतकरी संजीवन कांदे यांच्या शेतात ऊसाचे पीक उभे होते. ऊसाची वाढ चांगली झाली होती. लवकरच हे पीक कारखान्यात पाठवून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्या आणि ऊसाच्या फडाला आग लागली. ऊसाचे पीक कोरडे असल्याने आगीने काही क्षणांतच वेगाने फैलाव केला. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण ऊसाचे क्षेत्र आपल्या कवेत घेतले. आगीचे लोळ दूरवरूनही दिसत होते. आपल्या डोळ्यांसमोर मेहनतीने उभे केलेले पीक जळताना पाहून शेतकरी संजीवन कांदे यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना आग आटोक्यात आणण्यात यश आले नाही. या प्रयत्नात त्यांच्या हातालाही भाजल्याने मोठी जखम झाली. अग्निशमन बंब दाखल, मात्र पाच एकर ऊस वाचवण्यात अपयश घटनेची माहिती मिळताच केज नगरपंचायतीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने मोठे रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यापूर्वीच पाच एकरांवरील ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच कमी पावसामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. पाणीटंचाईमुळे पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागत आहे. अशा परिस्थितीत तयार झालेले ऊसाचे पीक आगीत नष्ट झाल्याने कांदे कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक महिन्यांची मेहनत, शेतीवर केलेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न या आगीमुळे एका क्षणात राख झाले. त्यामुळे परिसरातील शेतकरीही हळहळ व्यक्त करत आहेत. वाशिममध्ये पाणीटंचाईने 1,200 पेरूची झाडे सुकण्याच्या मार्गावर दरम्यान, बीडमधील आगीच्या घटनेप्रमाणेच राज्यातील इतर भागांतही दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा संकटात सापडल्या आहेत. जऊळका शिवारातील वडी येथील शेतकरी शिवाजी नागरे यांच्या अडीच एकर क्षेत्रातील पेरूची बाग पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. या बागेत तब्बल 1,200 पेरूची झाडे असून, पाण्याअभावी ती करपू लागली आहेत. नागरे यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीतून ही बाग उभी केली होती. गेल्या वर्षी या पेरूच्या बागेतून त्यांना सुमारे 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीतील पाणीसाठा संपला असून धरणातून पाणी उपसा करण्यावरही बंदी आहे. त्यामुळे बागेला पाणी देणे अशक्य झाले आहे. मेहनतीने उभी केलेली फळबाग डोळ्यांदेखत सुकताना पाहण्याची वेळ अडीच एकर क्षेत्रात उभी केलेली पेरूची बाग आता पाण्याअभावी सुकत असल्याने शिवाजी नागरे यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी ज्या बागेतून चांगले उत्पन्न मिळाले, त्याच बागेतील झाडे यंदा जगवणे कठीण झाले आहे. अनेक वर्षांची मेहनत आणि गुंतवणूक वाया जाण्याची भीती शेतकऱ्याला सतावत आहे. दुष्काळामुळे केवळ पारंपरिक पिकेच नव्हे, तर फळबाग उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष मदत करावी, अशी मागणी होत आहे. बीडमध्ये आगीमुळे ऊसाचे पीक नष्ट झाले, तर वाशिममध्ये पाणीटंचाईमुळे पेरूची बाग धोक्यात आली आहे. या दोन्ही घटनांमधून राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटाची तीव्रता अधोरेखित होत आहे. हेही वाचा…. ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’:अजित पवार विमान दुर्घटनेच्या तपासावरून हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ देत, ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’ असा खोचक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग, मतदारसंघ पुनर्रचना, अजित पवार विमान दुर्घटना आणि भाजपच्या राजकारणावरही भाष्य केले. सविस्तर वाचा…..
Source link
आधीच दुष्काळाचे संकट, त्यात आगीने घास हिरावला:बीडमध्ये शेतकऱ्याचा 5 एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरीही भाजला