Headlines

'आप' देणार मंत्री चंद्रकांत पाटलांना पंजाबचे विमानाचे तिकीट:पुणे मनपा शाळा खाजगीकरण वादात 'आप'ची अनोखी मागणी




पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून सध्या वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने (आप) एक अनोखे आंदोलन जाहीर केले आहे. ‘आप’ने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पंजाबचे विमानाचे तिकीट भेट देण्याचे ठरवले आहे. येत्या सोमवारी, २२ जून २०२६ रोजी ‘आप’चे पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील कार्यालयात जाऊन त्यांना हे तिकीट सोपवणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी पंजाब आणि दिल्लीला जाऊन तेथील शासकीय शाळांचा झालेला कायापालट स्वतः पाहून यावा, हा यामागील मुख्य हेतू आहे. नुकतेच पुणे मनपाच्या जनरल बॉडी मीटिंगदरम्यान ‘आप’ने शाळांच्या खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खाजगीकरणाचे समर्थन करत धक्कादायक विधान केले. “सरकारी शाळा मोठ्या प्रमाणावर सुधारता येऊ शकत नाहीत. भविष्यात भारती विद्यापीठ किंवा एस. पी. कॉलेजसारख्या संस्थांनी मनपा शाळांची मागणी केली, तर त्यांनाही आम्ही त्या चालवायला देऊ,” असे सांगत “पालकांनाही खाजगी शाळाच हव्यात,” असा दावा त्यांनी केला होता. या विधानाचा तीव्र निषेध करत ‘आप’ने सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. “उत्तम दर्जाच्या सरकारी शाळा तयार करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. त्यामुळेच परवडत नसतानाही पालक भरमसाठ फी भरून मुलांना खाजगी शाळेत घालतात,” असे ‘आप’च्या नेत्यांनी म्हटले आहे. ‘आप’चे प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून अशा बेजबाबदार विधानाची अजिबात अपेक्षा नव्हती. शासकीय संस्थांची गुणवत्ता सुधारणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पंजाबमध्ये चार वर्षांपूर्वी ‘आप’चे सरकार आले, तेव्हा तेथील शाळांचा देशात २७ वा क्रमांक लागत होता. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नीती आयोगाच्या अहवालानुसार, पंजाबच्या शाळा देशात पहिल्या क्रमांकावर आल्या आहेत. दिल्लीतही ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी खाजगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. चंद्रकांत पाटलांनी या शिक्षण क्रांतीचा प्रत्यक्ष अभ्यास करावा, अशी मागणी ‘आप’ने केली आहे. या आंदोलनात डॉ. अभिजीत मोरे, अमित म्हस्के, संजय कोने, अमोल मोरे, किरण कद्रे आणि नितीन कुटे-पाटील आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *