![]()
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, कुपोषणाला आळा बसावा आणि लहानपणापासूनच सेंद्रिय शेतीची ओळख व्हावी, या उद्देशाने जळकोट तालुक्यातील चेरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वसुंधरा महिला शेतकरी गटाने ”पोषण परसबाग” हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम साकारला आहे. उमेद अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात आता विविध सेंद्रिय भाज्यांची हिरवाई बहरली असून विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात ताज्या, पौष्टिक आणि रासायनिक खतमुक्त भाज्यांचा समावेश होणार आहे. महिला शेतकरी गटाने शाळेच्या आवारातील रिकाम्या जागेची मशागत करून ती सुपीक केली. त्यानंतर पालक, मेथी, शेपू, माठ, टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, गवार, दुधी भोपळा, कारली, पडवळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेवगा यांसारख्या पोषणमूल्यांनी समृद्ध भाज्यांची लागवड करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत महिला शेतकऱ्यांनी श्रमदान करत विद्यार्थी आणि शिक्षकांना सेंद्रिय शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही दिले. या परसबागेमुळे विद्यार्थ्यांना ताज्या भाज्यांचा लाभ मिळणार असून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार, पर्यावरण संवर्धन, शेतीविषयक ज्ञान आणि स्वावलंबनाची भावना विकसित होणार आहे. शाळेलाही बाहेरून भाज्या खरेदी करण्याचा खर्च वाचणार असल्याने आर्थिक बचत होणार आहे.यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार तेलंग तसेच पंचायत समिती जळकोटचे सहायक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे यांची प्रमुख उपस्थिती होती. वसुंधरा महिला शेतकरी गटाचा पुढाकार उमेद अभियानांतर्गत वसुंधरा महिला शेतकरी गटाच्या कृषी सखी सुचिता लक्ष्मण मरेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सीआरपी ज्योती तांबवाडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जयमाला कटके, जयश्री कटके, भाग्यश्री कटके, शितल मरेवाड, संध्या मरेवाड, सुलक्षणा मरेवाड, सुष्मिता माने, मनिषा माने, पार्वती माने, शांता मरेवाड, अंजली येवरे, भामाबाई मरेवाड, मंजू मरेवाड आणि अर्चना राजगिरवाड या महिला शेतकरी सहभागी झाल्या.
Source link
आरोग्याचा संकल्प:विद्यार्थ्यांच्या ताटात शाळेतच पिकलेल्या सेंद्रीय भाज्या