![]()
तालुक्यातील शाळांमध्ये आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, आता शिल्लक शिक्षकांना निवडणूक विभागाच्या ‘बीएलओ’ (मतदार नोंदणी अधिकारी) कामाला जुंपण्यात आले आहे. याचा थेट आणि प्रचंड मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असून, उजनी परिसरातील पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या उजनीसह परिसरातील बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. एकाच शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळत कसरत करावी लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत उपलब्ध शिक्षकांनाही मतदार यादी दुरुस्ती, नाव नोंदणी आणि घरोघरी जाऊन मतदार पडताळणी करण्याची कामे दिली जात आहेत. यामुळे शिक्षक शाळेत शिकवण्याऐवजी गावातील गल्लोगल्ली आणि लोकांच्या घरांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. परिणामी, शाळांमधील नियमित तासिका बुडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्त करावे, असा न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही प्रशासनाकडून उजनी आणि औसा तालुक्यातील शिक्षकांवर बीएलओच्या कामाची सक्ती केली जात आहे. एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे शिक्षकांना वर्गाबाहेर ठेवायचे, हा शासनाचा दुटप्पीपणा आहे. पालकांचा उद्वेग आणि भवितव्याची चिंता. आम्ही ग्रामीण भागातील लोक अनेक अडचणींवर मात करून मुलांना शिकण्यासाठी शाळेत पाठवतो, पण गुरुजीच नसतील तर मुलांचे भविष्य कसे घडणार? त्यातच परीक्षा जवळ येत असल्याने अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार,अशी चिंता विद्यार्थी व्यक्त करत आहेत. शब्बीर शेख, पालक उजनी.
Source link
शिक्षक दारोदारी; बीएलओ कामांमुळे शैक्षणिक नुकसान:उजनीसह परिसरातील शाळांमध्ये गुणवत्तेवर परिणाम, पालकांमधून व्यक्त होतोय तीव्र संताप