![]()
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर भूमिका स्पष्ट केली. धारणी आणि चिखलदरा परिसरातील आश्रमशाळांमधील अन्नविषबाधा प्रकरण, पेपरफुटीविरोधातील कठोर कायदे, नागपूरमधील अतिक्रमण हटविण्याची मोहीम, पावसाची स्थिती आणि ठाकरे बंधूंच्या आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. आश्रमशाळेतील अन्नविषबाधा प्रकरणात गुन्हा दाखल धारणी तालुक्यातील आश्रमशाळेत झालेल्या अन्नविषबाधेच्या घटनेत 69 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. प्राथमिक तपासात शिळे अन्न दिल्यामुळे विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. याप्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासन विभागानेही तपास सुरू केला आहे. संबंधित सेंट्रल किचनचे संचालक विजय बोथरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आदिवासी पालकांकडून ‘सेंट्रल किचन’ऐवजी ‘डिसेंट्रलाइज्ड किचन’ची मागणी होत असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, “एका ठिकाणाहून हजारो विद्यार्थ्यांसाठी अन्न पुरवले जाते. अशा वेळी एखादी त्रुटी झाल्यास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार केला जात आहे.” त्यांनी सांगितले की, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घटनास्थळी भेट दिली असून सरकारने रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवले. सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्यात आले असून सध्या सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. पेपरफुटी करणाऱ्यांची ‘हिंमत होणार नाही’ एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या आरोपांवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा विषय अत्यंत गंभीरतेने हाताळत आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले आहे. टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. संसदेत कठोर कायदा आणला जात आहे. या कायद्यामुळे पेपरफुटी करणाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. भविष्यात अशा गैरप्रकारांची कोणाचीही हिंमत होणार नाही,” असा दावा त्यांनी केला. जात पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या जात पडताळणी प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी समित्या कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनीही यासंदर्भात निर्णय घेतल्याचे सांगत प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हलबा समाजाच्या विविध मागण्यांबाबत महाधिवक्त्यांचे (एजी) मत मागवण्यात आले असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. नागपुरात अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष टास्क फोर्स नागपूर महानगरपालिकेने प्रथमच स्वतःचा बुलडोझर खरेदी केल्याची माहिती देत बावनकुळे म्हणाले की, हा बुलडोझर केवळ अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी वापरला जाणार आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सा अधिकाऱ्यांची विशेष अतिक्रमण समिती आणि स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून शहरभर पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नुकसानीवर सरकारचे लक्ष पावसातील खंड आणि दुबार पेरणीच्या शक्यतेबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत धरणांतील पाणीसाठा, मदत-पुनर्वसन आणि पीकस्थिती या तीन विषयांवर सविस्तर आढावा घेतला जातो. दुबार किंवा तिबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महसूल विभाग सतर्क असून प्रत्येक जिल्ह्यात परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल मालमत्ता नोंदणीबाबत नागरिकांना आवाहन डिजिटल मालमत्ता नोंदणीसाठी सरकारने अनेकदा मुदतवाढ दिल्याचे सांगत नागरिकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. वारंवार संधी दिल्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास पुढील कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रस्ते खोदकामासाठी समन्वय समितीची तयारी जलवाहिन्या, केबल किंवा इतर कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याने सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याचे सांगत त्यांनी सर्व विभागांचा समन्वय साधणारी समिती स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. रस्ता खोदण्यापूर्वी भूमिगत केबल, पाइपलाइन आणि इतर सुविधा शोधणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही सरकार भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर टोला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आंदोलनाबाबत विचारले असता बावनकुळे यांनी मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली. “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, बँड वाजवत आहेत, बारसं कोणाचं आणि वारस कोणाचा हेच कळत नाही. त्यांना त्यांचं करू द्या,” असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत, पेपरफुटीचा विषय त्यांनी स्वतः हातात घेतला असून कठोर कायद्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध निर्णायक कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. हेही वाचा… सरकारची विरोधकांना देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती; पैशांचे आमिष दाखवून मते घेतली, ती परत करणार का? लाडकी बहीणवरून इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल
सत्तेसाठी पैशांचे आमिष दाखवून मते मिळवायची आणि नंतर वसुलीच्या गप्पा मारायच्या, ही भाजपची खरी प्रवृत्ती आहे.भाजपने महाराष्ट्रात केवळ सत्तेत येण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ घाईघाईने लागू केली. आता सत्तेवर आल्यानंतर योजनेतील तब्बल 90 लाख लाभार्थी अपात्र असून त्यात पुरुषांचाही समावेश असल्याचे सांगत मंत्री अतुल सावे पैसे वसूल करण्याची भाषा करत आहेत. “जर अपात्र लोकांकडून पैसे परत घेणार असाल, तर पैशांचे आमिष दाखवून जे मतदान पदरात पाडून घेतले, ते मते भाजप परत करणार आहे का? असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. येथे वाचा सविस्तर
Source link
आश्रमशाळेतील अन्नविषबाधेपासून पेपरफुटीपर्यंत:चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कडक कायद्याने गैरप्रकारांना आळा बसणार