Headlines

आषाढी वारीतील 'विठ्ठलसेवे'तून एसटीची तिजोरी भरली:यावर्षी मिळाले 41.18 कोटींचे उत्पन्न, गतवर्षीपेक्षा 5.30 कोटींची वाढ




महाराष्ट्राची लोकधारा आणि भक्तीपरंपरेचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदाही राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ वारकऱ्यांची हक्काची सोबती ठरली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल दर्शनाची आस घेऊन निघालेल्या तब्बल ९ लाखांहून अधिक भाविकांना एसटीने सुखरूप पंढरीला पोहोचवले. विशेष म्हणजे, यात्रेनिमित्त केलेल्या या विशेष वाहतुकीतून एसटीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५ कोटी ३० लाख रुपयांची भरघोस वाढ झाली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत, ही प्रवासी वाहतूक नसून महामंडळाने केलेली ‘विठ्ठलसेवा’च असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ५,५०० बसेस, २१ हजारांहून अधिक फेऱ्या आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून विशेष वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन केले होते. यात्रेच्या काळात सुमारे ५ हजार ५०० जादा बसेसच्या माध्यमातून तब्बल २१ हजार ५२७ फेऱ्या मारण्यात आल्या. यातून ९ लाख २४ हजार ७३८ भाविकांनी सुरक्षित आणि सुखकर प्रवास केला. या प्रचंड प्रतिसादातून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या वारी हंगामाच्या तुलनेत हे उत्पन्न ५ कोटी ३० लाखांनी अधिक आहे. ९ लाख वारकऱ्यांना घरी पोहोचवणे हीच विठ्ठलसेवा या विक्रमी कामगिरीवर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात हरिनामाचा गजर घेऊन निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या या भक्तीमय प्रवासाचा वाटेकरी होण्याचे भाग्य लालपरीला दरवर्षी मिळते. एखाद्या भाविकाला सुखरूप पंढरपूरला नेणे आणि दर्शन झाल्यानंतर त्याला पुन्हा सुरक्षित त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे, हे आमचे कर्तव्यही आहे आणि आमचे भाग्यही. ही केवळ साधी प्रवासी वाहतूक नाही, तर एसटीच्या माध्यमातून घडलेली प्रत्यक्ष विठ्ठलसेवाच आहे.” अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक यात्रेच्या काळात प्रचंड गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि ताण असतानाही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. स्वतःच्या घरातील सण, उत्सव बाजूला ठेवून रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत रुजू असणारे एसटीचे हजारो चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सरनाईक यांनी विशेष अभिनंदन केले. ‘प्रवासी देवो भव:’ “वारकऱ्यांच्या पावलात जशी भक्ती असते, तशीच या लाखो भाविकांची सेवा करणाऱ्या एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घामात मला विठ्ठलसेवा दिसते. भविष्यातही ‘प्रवासी देवो भव:’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यातील प्रत्येक प्रवाशाला विठुराया मानून आपली सेवा अशीच अविरत सुरू ठेवावी,” असे आवाहनही प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले. हे ही वाचा… फडणवीस राज्यातच राहणार, वावड्यांवर विश्वास ठेवू नका:चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, शिंदेंच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याच्या अफवांवर आणि वावड्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करू शकतात,” असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेतला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *