Headlines

उजनी धरण ठरतेय समृद्ध मत्स्यसंपदा अन् जैवविविधतेची ‘जीवदायिनी’:केत्तूर, पारेवाडी जवळील पाच पूलाजवळील घटना




उजनी जलाशयातील समृद्ध मत्स्यसंपदा आणि जैवविविधतेचे आणखी एक महत्त्वपूर्ण उदाहरण समोर आले आहे. केत्तूर, पारेवाडी (ता. करमाळा) जवळील पाच पूलाजवळ चांडगाव (ता. इंदापूर) परिसरात स्थानिक मच्छीमार योगेश खानेवाले यांच्या जाळ्यात तब्बल २५ किलो वजनाचा कटला मासा अडकला. एवढ्या मोठ्या आकाराच्या माशाची नोंद झाल्याने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासह मत्स्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उजनी धरणाला सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. राज्यातील महत्त्वाच्या मत्स्य उत्पादन केंद्रांपैकी एक असलेल्या या जलाशयात विविध स्थानिक तसेच संवर्धित मत्स्यप्रजाती आढळतात. अलीकडेच मत्स्य संशोधक डॉ. रणजित मोरे यांनी केलेल्या सर्वेक्षणात उजनी जलाशयात एकूण ५६ मत्स्यप्रजातींची नोंद झाली असून त्यावरील संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे २५ किलो वजनाच्या कटला माशाची ही नोंद विशेष महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान खानेवाले यांच्या जाळ्यात अचानक मोठा ताण जाणवला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मासा पाहण्यासाठी गर्दी केली. स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार, उजनी जलाशयात मोठ्या आकाराचे मासे अधूनमधून आढळतात; मात्र एवढ्या वजनाचा कटला गेल्या काही वर्षांतील दुर्मीळ नोंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उजनी धरण पुन्हा एकदा मत्स्यसंपदेची ‘जीवदायिनी’ असल्याचे सिद्ध झाले आहे. ^कटला हा भारतीय प्रमुख कार्प गटातील आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मासा आहे. २५ किलो वजनाचा मासा आढळणे ही बाब जलाशयातील पोषक वातावरण, विपूल खाद्यसाखळीचे निदर्शक आहे. अशा नोंदी मत्स्यसंपदेच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतात, मत्स्यसंवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक संकेत मानल्या जातात. – डॉ. रणजित मोरे, मत्स्य संशोधक, करमाळा ^मऊ व चवदार मांस असलेला रोहू, कटला, मासा खूप लोकप्रिय आहे. प्रथिने, ओमेगा-३ मेदाम्ले व अनेक जीवनसत्त्वे विपूल प्रमाणात असलेल्या या माशाला खवय्यांकडून मोठी मागणी असते. एरवी ५-१० किलो वजनापर्यंत वाढ होणारा परंतू तब्बल २५ किलो वजनाचा मासा उजनी जलाशयात सापडणे अतिशय दुर्मिळ घटना आहे. उजनीच्या प्रदूषित पाण्यात माशांची निकोप वाढ होते. – डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक ^शासनाच्या मत्स्यबीज संवर्धन उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता उजनी जलाशयात दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत सोडण्यात आलेल्या मत्स्यबीजामुळे मोठ्या माशांची संख्या वाढत असून, जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्याने हे मासे सहज सापडत आहेत. आगामी काळात उजनीतील मासेमारी व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल. – कल्याणराव साळुंके, पक्षीमित्र, करमाळा तज्ज्ञांच्या मते, एवढ्या मोठ्या आकाराचा कटला मासा आढळणे म्हणजे जलाशयातील अन्नसाखळी, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरणीय परिस्थिती माशांच्या वाढीसाठी अनुकूल असल्याचे द्योतक आहे. उजनी आजही समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सदर मासा मार्केटला २७० किलो दराने विकला गेला असता मात्र या एका माशाला ६७५० रुपये मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *