Headlines

नवले पुलाजवळ सिमेंट मिक्सर उलटला, दुचाकीस्वार जागीच ठार:पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, चालकावर गुन्हा दाखल




पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पल्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरातील अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. नऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक लेलंड कंपनीचा १६ चाकी सिमेंट मिक्सर (एमएच 12 आरएन 2866) कात्रजकडून बावधनच्या दिशेने जात होता. चालक गोरख लक्ष्मण रनसुरे (वय ५०) हा वाहन अतिशय निष्काळजीपणे आणि अतिवेगाने चालवत होता. नवले चौकातून वळण घेत असताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अवजड मिक्सर रस्त्यावरच पलटी झाला. यावेळी मिक्सरच्या डाव्या बाजूने बावधनच्या दिशेने जाणारी होंडा शाईन दुचाकी (एम एच 23 बी एल 5225) या पलटी झालेल्या मिक्सरखाली पूर्णपणे चिरडली गेली. दुचाकीस्वार रामेश्वर मच्छिंद्र भोगले (वय ३१, रा. वाघजाई नगर, कात्रज; मूळगाव सांगवी, जि. बीड) यांचा जागीच अंत झाला. अपघातात सिमेंट मिक्सर चालक गोरख रनसुरे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोठ्या क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केली आणि मध्यरात्री खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. मृत रामेश्वर भोगले यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून, जखमी चालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांनी सांगितले की, निष्काळजीपणे आणि अतिवेगाने वाहन चालवून मृत्यू व मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येत आहे. आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. नवले पुलावरील अवजड वाहनांच्या वेगावर पोलिसांनी कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *