Headlines

उत्सवी हंगामात पुण्यातील घरखरेदीला सकारात्मक प्रतिसाद:ग्राहक सजग, चांगल्या लोकेशन आणि सुविधांना पसंती; 80 लाखांवरील घरांची मागणी वाढली




पुण्यात सध्या सुरू असलेल्या उत्सवी हंगामात घरखरेदीदारांचा कल सकारात्मक असून, ग्राहक अधिक सजग आणि माहितीपूर्ण निर्णय घेत असल्याचे निरीक्षण क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनिष जैन यांनी व्यक्त केले. “पुण्याच्या निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेने आता अधिक परिपक्व टप्प्यात प्रवेश केला आहे. घरखरेदीची मागणी प्रामुख्याने प्रत्यक्ष घराची गरज असलेल्या ग्राहकांकडून होत असून, चांगले लोकेशन, दर्जेदार सुविधा आणि दीर्घकालीन मूल्य देणाऱ्या घरांना ग्राहकांची पसंती मिळत आहे,” असे जैन यांनी सांगितले. अलीकडील संशोधन अहवालांमध्येही अधिक मूल्याच्या घरांकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. नव्या प्रकल्पांच्या लाँचिंगमध्ये ८० लाख ते १.५ कोटी रुपयांच्या किंमत श्रेणीतील घरांचा वाटा लक्षणीय असल्याचे जैन यांनी नमूद केले. गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील विविध गृहप्रकल्पांना भेटी देणाऱ्या ग्राहकांची संख्या चांगली होती. यामध्ये आधीपासूनच विविध प्रकल्पांचा विचार करणारे आणि उत्सवी काळातील ऑफर्सचा लाभ घेऊन घरखरेदीचा निर्णय घेऊ इच्छिणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. “आगामी नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर घरखरेदीतील ही सकारात्मक घडामोड आणखी वेग घेईल, अशी अपेक्षा आहे. उत्सवी काळातील घरखरेदी आता केवळ शुभ मुहूर्तापुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्राहक दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करून, उपलब्ध पर्यायांची माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यावर भर देत आहेत,” असे जैन म्हणाले. पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राची मूलभूत स्थिती भक्कम असल्याने नवरात्र आणि दसरा हा घरखरेदीच्या निर्णयांना चालना देणारा महत्त्वाचा कालावधी ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *