![]()
सातारा परिसरातील नाथ टॉवर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती वैचारिक देवाण-घेवाणीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली. सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती धनशेट्टी (शिंदे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुशीला घोडके, नाथ मल्टिस्टेट बँकेचे संचालक सिद्धेश्वर वायकर, सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य भगवानराव पाटील, बिझनेस कोच नीलेश काळे उपस्थित होते. शिक्षण हे आपल्या वर्तणुकीत उतरले पाहिजे – पीआय घोडके यावेळी बोलताना पीआय सुशीला घोडके यांनी बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडून दाखवताना छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचे महिलांविषयीचे कार्य प्रामुख्याने उलगडून दाखवले. तसेच उपस्थितांना कालानुरूप बदल स्वीकारून पुढे मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, शिवाजी महाराजांनी 300 वर्षांपूर्वी कोणत्या प्लॅनिंगने लढा देऊन आपले साम्राज्य उभे केले याची जाण प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही शिकवण दिली. माणसाच्या वागण्यात, बोलण्यात, आचरणात शिक्षण नसेल, तर त्याचे शिक्षण काहीही कामाचे नाही. त्यासाठी शिक्षण हे आपल्या वर्तणुकीत उतरले पाहिजे. शिक्षण असेल तर ध्येय गाठता येतात. इतकेच नाही तर शिक्षणात विचारही असला पाहिजे. पण केवळ विचार असून जमणार आहे का? आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून वागले पाहिजे. आपण एखादे काम करतो तेव्हा मनात सहकार्याची भावना असली पाहिजे. बाबासाहेब केवळ पुस्तकात लपवून न ठेवता, संविधानात दडवून न ठेवता ते प्रत्येकाच्या मनात उतरले पाहिजेत, ते प्रत्येकाच्या आचरणात उतरले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
सुशीला घोडके यांनी यावेळी कवी वामनदादा कर्डक यांचे आपल्या सुरेल आवाजात उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे गाणेही म्हणून दाखवले. त्यांच्या गायनाला सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी अवघ्या 3 वर्षांच्या पारमी घोडके हिनेही आपल्या बोबड्या शब्दांत बाबासाहेब उतरवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची गरज – नीलेश काळे बिझनेस कोच नीलेश काळे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच समाजात अजूनही थोड्याफार प्रमाणात जातीयवाद असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, आपल्या महापुरुषांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवले. पण आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजात अजूनही जातीयवादाला का सामोरे जावे लागते? आपण तो या समाजाचा, तो त्या समाजाचा यात का अडकलो आहोत? बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार सांगितले ते हेच होते की, आपण सगळे त्याच हाडामासाचे आहोत. काय फरक करण्याची गरज आहे. याच विचारांपासून मुक्ती देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. दुर्दैवाने आजही ते विषय थोड्याअंशी का होईना समाजात शिल्लक आहे. आपण हे नाकारू शकत नाही. आपण आपल्या परीने हे कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण करत नाही. पण एक गोष्ट चांगली होत आहे. हे आता हळूहळू लोकांच्या मनात उतरायला लागले आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. आपण बाबासाहेबांच्या या मिशनला पुढे नेले पाहिजे. आपल्यात विनाकारण उरलेले छोटेसे वैर ते आणखी कमी केले पाहिजे. हीच आपण बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिलेली खरीखुरी आदरांजली होय, असे काळे म्हणाले. बाबासाहेबांनी काय शिकवले हे आत्मसात करण्याची गरज – दुधमल बाप्पासाहेब दुधमल यांनी आपल्या मनोगतात अत्यंत विचारप्रवर्तक मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ समाजाला हक्क मिळवून दिले नाहीत, तर शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा मार्गही दाखवला. मात्र, आजच्या काळात त्यांच्या विचारांचा केवळ गौरव न करता ते प्रत्यक्ष आयुष्यात आत्मसात करण्याची खरी गरज आहे. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, अंधश्रद्धा, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध ठामपणे उभे राहून, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत बाबासाहेबांच्या विचारांची अंमलबजावणी करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. महापुरुषांचा वारसा पुढे नेण्याची गरज – लोखंडे पत्रकार भाग्यदर्शी लोखंडे यांनीही यावेळी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करत आहोत. त्या निमित्ताने आपल्या सोसायटीत आयोजित केलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उपस्थित आहात, हे पाहून मनापासून आनंद होत आहे. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी समता, न्याय व स्वाभिमानाचा दीपस्तंभ होते. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मंत्र आजही प्रत्येकाला मार्गदर्शन करणारा आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. मनुष्य महान जन्माने होत नाही, तर कर्माने महान होतो, या एका वाक्यात त्यांनी संपूर्ण जीवनाचा अर्थ सांगितला आहे. लोखंडे पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी आपल्या काळात वादळात स्वराज्याची इवलिशी ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक नवा स्वाभिमानी समाज घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर प्रामुख्याने महात्मा यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक क्रांती घडवली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी या समाजात संविधानाच्या माध्यमातून प्राण ओतण्याचे काम केले. त्यांनी सामाजिक वाईटांवर कुठाराघात घातला. त्यामुळे आज आपण सर्वजण ताठ मानेने समाजात वावरत आहोत. आज महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वाटचाल केली, तर भारत अजूनही पुढे जाईल. एक महासत्ता म्हणून उदयास येईल. सध्याचा काळ जातीय विषमतेत गुरफटत चालला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे. महापुरुषांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवले आहे. त्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नसेल, तर किमान आहे त्या ठिकाणी तरी आपण थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण चुकूनही पाऊल मागे पडू नये, याची सर्वांनी विशेषतः महिला वर्गाने काळजी घेतली पाहिजे. कारण, कोणताही महापुरुष हा महिलांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जिजाऊंमुळे घडले. महात्मा फुले सावित्रीमाईंमुळे घडले. तसेच बाबासाहेब आंबेडकर हे रमाईमुळे घडले हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे लोखंडे म्हणाले. सोसायटीचे सचिव किरण साळुंके यांनी यावेळी बाबासाहेबांनी माणसाला माणूस जगण्याची अनमोल शिकवण दिल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सोसायटीचे सदस्य पत्रकार सचिन बडे, बाप्पासाहेब दुधमल, अशोक घोडके, भगीरथ दवणे, सुरेंद्र साळुंके, पवन बरबडे, शरद पऱ्हाड, ज्ञानेश्वर नरके, गणेश नरवडे, गुलशन मुंदडा, संदीप जाधव, दीपक अग्रवाल, राहुल जाधव, तेजस शिंदे, राजेंद्र दुथडे, बनसोडे साहेब, डॉक्टर विठ्ठल लांडगे, सुनील शिंदे आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे:बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची गरज; सातारा परिसरात भीम जयंतीच्या निमित्ताने वैचारिक उलाढाल