![]()
महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी पुणे शहराला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्ष संघटन, पुण्यातील सद्यस्थिती आणि विविध समकालीन विषयांवर भाष्य केले. उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळत असलो तरी मी पक्षाचा एक कार्यकर्ता असून संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अहिर यांनी जेजुरी देवस्थानालाही भेट दिली. तेथील विकासनिधी आणि विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. घटनात्मक पदावर असल्यामुळे राजकीय व्यासपीठांवर काही मर्यादा पाळाव्या लागतात, मात्र पक्ष संघटनेसाठी काम करण्यावर त्याचा परिणाम होणार नाही, असे त्यांनी नमूद केले. पुणे महापालिकेत सध्या शिवसेनेचा एकही नगरसेवक नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यामागील राजकीय परिस्थिती सर्वांना ज्ञात असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात पुण्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी व्यापक संघटनात्मक बदल केले जात असून, युवासेनेतील काही पदाधिकाऱ्यांना मुख्य संघटनेत जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध समाजघटकांतील आणि वंचित घटकांतील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही अहिर यांनी सांगितले. इतर पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता, ‘मी स्वतःहून कुणाला पक्षात आणण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र इच्छुक स्वतःहून आले तर त्यांचे स्वागत केले जाईल,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रासंदर्भात योग्य तो निर्णय सरकार घेईल, असे अहिर म्हणाले. नाशिकमधील घटनेवर प्रतिक्रिया देताना, अशा घटनांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याचे त्यांनी म्हटले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबतची भूमिका ही वैयक्तिक असल्याचे स्पष्ट करत अहिर म्हणाले की, त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या चळवळीतील कार्यकर्त्या असल्याने पक्ष सोडणार नाहीत. पक्षाने त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना, ‘बॅनर लावून पालकमंत्रीपद मिळत नाही. हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारचे चांगले काम असेल तेथे कौतुक आणि आवश्यक ठिकाणी सूचना देणे हीच उपसभापती म्हणून आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आपण अधिक वेळ देणार आहोत. येत्या काळात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढलेली दिसेल, असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
Source link
उपसभापती सचिन अहिर पुणे दौऱ्यावर:शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी करणार काम