Headlines

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; मुंबई-एमएमआरमध्ये 30 लाख घरांचा मेगा प्लॅन!:ठाण्यात 6 हजार कुटुंबांना हक्काची घरे; 23 नागरी सुविधांसह ‘नव्या ठाण्या’ची उभारणी




मुंबई आणि एमएमआर परिसरातील वाढत्या घरांच्या गरजा लक्षात घेता, पुढील 15 ते 20 वर्षांत तब्बल 30 लाख घरे बांधण्याचे नियोजन असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरांमध्ये क्लस्टर विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. सुमारे 20 हेक्टर म्हणजेच 50 एकर परिसरात हा क्लस्टर विकसित करण्यात येणार असून, त्यातून तब्बल 6 हजार कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार हक्काची घरे उपलब्ध होणार आहेत. केवळ इमारती नाही, तर ‘सिटी विथिन द सिटी’ क्लस्टर विकास म्हणजे केवळ जुन्या इमारती पाडून नवीन निवासी इमारती उभारणे नव्हे, तर नागरिकांना आधुनिक नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित जीवनमान उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या क्लस्टरमध्ये 23 प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मोठे आणि प्रशस्त रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्सची सुविधा, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग यांचा त्यात समावेश आहे. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा संपूर्ण परिसर विकसित केला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 20 वर्षांच्या संघर्षानंतर क्लस्टरला गती ठाण्यातील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या दुर्घटनांचा संदर्भ देताना एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेचा प्रवास सुमारे 20 वर्षांच्या संघर्षानंतर पुढे आल्याचे सांगितले. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह विविध दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषणे, मोर्चे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. नगरविकास मंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून क्लस्टर विकासातील धोरणात्मक अडथळे दूर करून योजना प्रत्यक्षात आणल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. किसननगरमधील क्लस्टरच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ‘घरातून उतरा आणि जवळच कामाला जा’ क्लस्टरमध्ये केवळ निवासी बांधकाम न करता व्यावसायिक विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवरही भर देण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘वॉक टू वर्क’ या संकल्पनेतून नागरिकांना घरापासून जवळच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे,” या पद्धतीने स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यामुळे क्लस्टर विकासातून घरांसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा त्यांचा दावा आहे. सिद्धेश्वर तलावाचेही पुनर्विकासाचे नियोजन सिद्धेश्वर तलाव परिसराच्या पुनर्विकासाबरोबरच तलावाची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तलाव परिसराला मोकळा श्वास मिळावा आणि नागरिकांसाठी अधिक चांगले वातावरण निर्माण व्हावे, यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रहिवाशांच्या मागण्यांवरही विचार क्लस्टरमधील रहिवाशांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबतही शिंदे यांनी सकारात्मक संकेत दिले. कॉर्पस फंड, अतिरिक्त 100 चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे त्यांनी सांगितले. विकासकांना दर्जाबाबत स्पष्ट सूचना देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “दोन पैसे कमी नफा झाला तरी चालेल; नागरिकांच्या घरांच्या दर्जात कपात करू नका.” नागरिकांना चांगल्या दर्जाची घरे आणि सुविधा मिळण्यासाठी सरकार तसेच महापालिकेकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मेट्रो, कोस्टल रोड, ठाणे-बोरिवली बोगद्यामुळे ठाण्याला नवी दिशा मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ठाणे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. क्लस्टरमधील इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयकॉनिक इमारतींच्या उभारणीसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘क्लस्टर म्हणजे बदललेले जीवनमान’ “क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे; चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान,” असा संदेश शिंदे यांनी यावेळी दिला. क्लस्टर योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना त्यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या ओळींचाही दाखला दिला. कार्यक्रमाच्या अखेरीस विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देण्यासोबतच चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मिश्कीलपणे मोठा टीव्ही भेट म्हणून देण्याची सूचनाही शिंदे यांनी केली. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. माधव कुसेकर, प्रशांत रोडे, सभागृह नेते हनुमान जगदाळे, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक नारायण पवार, राम रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम, संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हेही वाचा.. राज्यातील 558 अनुदानित आश्रमशाळांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ होणार:मंत्री अशोक उईके यांची घोषणा; अभिजीत दिपकेंनाही आव्हान राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या 558 अनुदानित आश्रमशाळांचे आता ‘थर्ड पार्टी ऑडिट’ सुरू केले जाणार असून, यातील 80 टक्क्यांहून अधिक आश्रमशाळा या काँग्रेस नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *