![]()
राज्यात पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शेतांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, या दौऱ्याच्या नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी काही ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आल्याचे, तसेच शेताच्या परिसरात पोलिसांकडून मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. काही ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये, ‘मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्याच स्थानिक नेत्यांनीच अडचणीत आणायचं ठरवलंय की काय?’ असा सवाल केला. दुष्काळाची पाहणी ही थेट शेतात जाऊन करायची असते. मात्र, एका ठिकाणी शेतातच टेबल लावून जळालेले पीक प्रदर्शनाप्रमाणे मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ‘शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांपासून का रोखलं जातंय?’ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री ज्या ठिकाणी येणार होते त्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना आपली व्यथा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती सांगू नये म्हणून त्यांना अडवलं जातंय का? की हा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही तर पुढाऱ्यांसाठी आहे?’, असा सवाल पवार यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी सरकार आणि शेतकरी यांच्यात वाढत असलेल्या दुराव्याचाही मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जात असतील, तर त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांना थेट पोहोचण्याची संधी मिळायला हवी, असा रोहित पवार यांच्या टीकेचा रोख आहे. ‘शेतात बॉम्ब लावले आहेत का?’ दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी शेताच्या परिसरात मेटल डिटेक्टर वापरण्यात आल्याच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी खोचक सवाल केला. ‘शेतकऱ्यांनी शेतात बॉम्ब लावले आहेत का? ते अधिकाऱ्यांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर फेकणार आहेत का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, सामान्य नागरिकांपासून एवढी भीती वाटत असेल तर दौरेच रद्द करा आणि कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करा, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आणि शेतमजुरांना 25 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. फडणवीसांकडून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीदरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. लातूर-धाराशिव भागात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळसदृश परिस्थितीबाबत लवकरच शासन निर्णय काढला जाईल, तसेच शेतकऱ्यांना पाणी, चारा आणि रब्बी हंगामासाठी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यातील पीक नुकसानीचे पंचनामेही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुष्काळी परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. डिंबे-माणिकडोह बोगद्यावरूनही रोहित पवारांची टीका दरम्यान, अहिल्यानगरसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या डिंबे-माणिकडोह बोगद्याच्या कामाच्या श्रेयावरूनही रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या प्रकल्पाचे काम आणि पाठपुरावा याबाबत सध्याच्या सरकारमधील नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना त्यांनी नाकारलेले नसले, तरी प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा दावा त्यांनी केला. मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही या प्रकल्पासाठी पाठपुरावा केल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, बोगद्याच्या कामात आंबेगावच्या आमदारांकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. विशेष म्हणजे, 2018 मध्ये भाजपचे सरकार असताना संबंधित आमदार विरोधी पक्षात होते आणि त्यावेळी त्यांनी बोगद्यासाठी पत्रव्यवहार केल्याचेही पवार यांनी सांगितले. एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी पावसाअभावी संकटात असताना मुख्यमंत्री प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचले आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्था आणि शेतकऱ्यांना भेटण्याच्या निर्बंधांवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न ठरणार की राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय बनणार, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा… एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; मुंबई-एमएमआरमध्ये 30 लाख घरांचा मेगा प्लॅन!:ठाण्यात 6 हजार कुटुंबांना हक्काची घरे; 23 नागरी सुविधांसह ‘नव्या ठाण्या’ची उभारणी मुंबई आणि एमएमआर परिसरातील वाढत्या घरांच्या गरजा लक्षात घेता, पुढील 15 ते 20 वर्षांत तब्बल 30 लाख घरे बांधण्याचे नियोजन असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरांमध्ये क्लस्टर विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सविस्तर वाचा…
Source link
मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर रोहित पवारांचा निशाणा:‘शेतात मेटल डिटेक्टर कशासाठी?’ असा सवाल, ‘शेतकऱ्यांनी शेतात बॉम्ब लावले आहेत का?’