![]()
नीट-युजी पेपरफुटी प्रकरणात कठोर कारवाई करत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी कोचिंग क्लासेस’चे संचालक व रसायनशास्त्राचे शिक्षक शिवराज मोटेगावकर यांना मोठा धक्का दिला आहे. एनटीएने शिवराज यांचे सुपुत्र आदित्य मोटेगावकर याच्यावर कारवाईचा बडगा उगारला असून, त्याला पुढील दोन वर्षांसाठी नीट परीक्षेस बसण्यास बंदी घातली आहे. तसेच, त्याची नीट युजी 2026 ची उमेदवारीही तात्काळ रद्द करण्यात आली आहे. 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या नीट-युजी परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात आदित्यने प्रश्नपत्रिका मिळवल्याचा किंवा ती इतरांना शेअर केल्याचा संशय व्यक्त करत एनटीएने त्याला 15 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, आदित्यने हे सर्व आरोप फेटाळून लावत एनटीएकडे पुरावे आणि सीबीआयच्या तपासाची माहिती मागितली होती. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर 20 जून रोजी घेण्यात आलेल्या पुनर्परीक्षेनंतर एनटीएने त्याचा निकाल राखून ठेवला होता. सीबीआयच्या पत्राने वाढल्या अडचणी या संपूर्ण प्रकरणात सीबीआयने 17 सप्टेंबर रोजी एनटीएला एक अधिकृत पत्र पाठवले. या पत्रात स्पष्ट करण्यात आले की, मे 2026 मध्ये झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील आदित्य मोटेगावकर हा थेट ‘लाभार्थी’ आहे. सीबीआयने दिलेल्या या महत्त्वपूर्ण अहवालामुळे आदित्यवरील संशय आणखी बळावला. मोबाईलमध्ये सापडले हुबेहूब प्रश्न सीबीआयच्या तपासादरम्यान आदित्यचे वडील शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये रसायनशास्त्राच्या 132 हस्तलिखित प्रश्नांचे फोटो आढळून आले होते. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी तब्बल 111 प्रश्न एनटीएच्या मूळ प्रश्नसंचाशी हुबेहूब जुळत असल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयात स्पष्ट केले. आदित्य हा सहआरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या विशेष वर्गांना उपस्थित राहत होता आणि तिथेच त्याला कथितरित्या हे लीक झालेले प्रश्न मिळाल्याचा दावा सीबीआयने केला आहे. एनटीए समितीचा अंतिम निर्णय सीबीआयने समोर आणलेले हे सर्व पुरावे आणि न्यायालयाच्या 15 सप्टेंबरच्या आदेशाची गांभीर्याने दखल घेत एनटीएच्या ‘यूएफएम’ समितीने आपला अंतिम निर्णय सुनावला. या निर्णयानुसार, आदित्य मोटेगावकर याची नीट युजी 2026 ची उमेदवारी रद्द करण्यात आली असून, पुढील कारवाईचा भाग म्हणून त्याला नीट युजी 2027 ची परीक्षा देण्यासही पूर्णपणे अपात्र ठरवण्यात आले आहे.
Source link
नीट पेपरफुटी प्रकरण:लातूरच्या मोटेगावकर कुटुंबाला मोठा धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांची बंदी