Headlines

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला उत्तर:सर्व आरोप फेटाळले, म्हणाले ‘तथ्यहीन आरोप’




दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना पाठवलेल्या 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या कायदेशीर नोटिशीला अखेर उत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी 26 पानी उत्तर देत नोटिशीतील आरोप फेटाळून लावले आहेत. सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली होती. या नोटिशीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या काही वक्तव्यांचा आणि सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ देण्यात आला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या वकिलांकडून या आरोपांना सविस्तर उत्तर देण्यात आले आहे. ‘पोस्टमध्ये सालियान यांचे नावच नाही’ आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी दिलेल्या उत्तरानुसार, 16 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियान यांचे नाव कुठेही घेण्यात आलेले नाही. तसेच पोस्टमधील कोणतेही विशिष्ट वाक्य सतीश सालियान यांच्याकडे निर्देश करत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान यांना आपण कधीही भेटलो नसल्याचे तसेच त्यांच्याशी आपली कोणतीही ओळख नसल्याचे म्हटले होते. गेल्या काही वर्षांपासून राजकीय हेतूने आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने आपले नाव दिशा सालियान यांच्या मृत्यूशी जोडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आपल्याविरोधात करण्यात येणाऱ्या चर्चांना कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा करत आदित्य ठाकरे यांनी अधिकृत यंत्रणांनी राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. ‘आरोप तथ्यहीन’ सतीश सालियान यांच्या कायदेशीर नोटिशीतील आरोप तथ्यहीन असल्याचे आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी उत्तरात म्हटले आहे. तसेच सतीश सालियान यांची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणातील आरोपांची अधिकृत यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक असल्याची भूमिका आदित्य ठाकरे यांच्या बाजूने मांडण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. काय आहे आदित्य ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट? आदित्य ठाकरे यांनी 16 सप्टेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये दिशा सालियान यांना आपण कधीही भेटलो नसल्याचे म्हटले होते. गेल्या सहा वर्षांपासून काही व्यक्तींकडून कोणताही पुरावा किंवा संबंध नसतानाही आपले नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच या प्रकरणावरून होणाऱ्या मीडिया ट्रायलवरही त्यांनी टीका केली होती. अधिकृत तपास यंत्रणांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. अशा प्रकारच्या आरोपांमुळे आपण शांत बसणार नसल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. आधी मातोश्रीवर पोहोचले होते सतीश सालियान दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणामुळे मातोश्रीबाहेरही राजकीय वातावरण तापले होते. सतीश सालियान आणि त्यांचे वकील अ‍ॅड. निलेश ओझा हे आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीची प्रत देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते. सामान्यपणे कायदेशीर नोटीस पोस्ट किंवा अन्य माध्यमातून पाठवली जाऊ शकते. मात्र, सतीश सालियान यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन नोटीस देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मातोश्रीबाहेर काही काळ राजकीय आणि माध्यमांचे लक्ष वेधले गेले होते. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मातोश्रीच्या गेटवरच ही नोटीस स्वीकारली होती. त्यानंतर सतीश सालियान यांनी आपण घाबरत नसल्याचे दाखवण्यासाठी आणि यापूर्वी करण्यात आलेल्या काही वक्तव्यांना आव्हान देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे सांगितले होते. दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत का? दिशा सालियान यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आणि आदित्य ठाकरे यांचे नावही राजकीय चर्चेत आले. सतीश सालियान यांनी यापूर्वीही या प्रकरणात तपासाची मागणी केली आहे. त्यांच्या बाजूने अ‍ॅड. निलेश ओझा हे कायदेशीर भूमिका मांडत आहेत. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील आरोप सातत्याने फेटाळले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आता 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीला आदित्य ठाकरे यांच्या वकिलांकडून 26 पानी उत्तर देण्यात आल्याने या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… आईसोबत बोलताना पाहिलं अन् मुलांचा संताप अनावर:प्रेमप्रकरणाच्या संशयातून BMC अधिकाऱ्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला, इगतपुरीत 53 वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी राधाकिसन तुकाराम वारघडे (वय 53) यांचा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरुडेश्वर येथे मध्यरात्रीच्या सुमारास वारघडे यांच्यावर लाठ्या-काठ्यांसह टणक वस्तूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *