![]()
विद्यार्थी जीवन हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असून, या काळाचा प्रत्येकाने सदुपयोग करणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याला आपण जितके महत्त्व देऊ, तितकाच तो आपल्या करिअरच्या टप्प्यावर आपल्याला नक्कीच फायदा करून देईल, असे प्रतिपादन एमजीएम विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत येरूळे यांनी केले. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, बी.एस्सी.च्या प्रथम वर्षात २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी शाहू महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ‘स्टुडंट लाइफ टू सक्सेसफुल प्रोफेशनल’ या विषयावर श्री. येरूळे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थी जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. ए. ए. भोंडवे,विभागप्रमुख डॉ. पी. एस. बैनाडे, प्राध्यापक, विद्यार्थी व संबंधित उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. येरूळे म्हणाले, विद्यार्थी जीवनातून यशस्वी व्यावसायिक होण्याच्या प्रवासात स्वप्न, सवयी, वेळेचे नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्वगुण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मोठी स्वप्ने पाहा, चांगल्या सवयी लावा, वेळेचा योग्य उपयोग करा आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवा. आजच्या काळात समाजमाध्यमांचा वापर करताना विशेष काळजी घ्यायला हवी. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला पर्याय म्हणून स्वतःला पुस्तके वाचण्याची सवय लावली पाहिजे. आपल्या करिअरसह शेती, करिअरपलीकडचे जीवन, जबाबदार नागरिकत्व आणि आरोग्य यांचाही विचार करा. या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, यशस्वी व्यावसायिक होण्याबरोबरच एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा; कारण शेवटी तुमची ओळख केवळ तुम्ही काय कमावले यावर नाही, तर तुम्ही किती चांगला माणूस म्हणून जगलात यावर ठरत असते. दीक्षारंभ कार्यक्रम हा प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाची महत्त्वपूर्ण सुरुवात आहे. शेती क्षेत्र हे देशाच्या विकासात आणि प्रगतीत सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आले आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला असून, भविष्यात शेती क्षेत्राच्या प्रगतीत योगदान देत तेच उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार आहेत, असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. ए. ए. भोंडवे यांनी केले. तसेच उत्कृष्ट लेखन, प्रभावी संवाद कौशल्य आणि एम.जी.एम. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्री श्रीकांत येरुळे यांचा परिचय प्रा.डॉ.सुशिल सातपुते यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश वानखेडे यांनी केले तर आभार कुणाल मस्के यांनी मानले.
Source link
सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न:‘विद्यार्थी जीवन हा आयुष्यातील सर्वोत्तम काळ; या काळाचा सदुपयोग करा’ – श्रीकांत येरूळे