![]()
पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात थेट सहभाग उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवले परिसरात 18 जुलै रोजी हर्षवर्धन पवार या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या गंभीर प्रकरणात पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री या दोघांचा कटामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. रक्षणकर्त्यांनीच भक्षक बनत खाकी वर्दीची प्रतिमा मलीन केल्याने, पुणे ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे तातडीने निलंबन केले आहे. या प्रकरणाच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोड्याच्या प्रयत्नानंतर तक्रारदार हर्षवर्धन पवार यांना खेडशिवापूर पोलिस चौकीत नेण्यात आले होते. तेथे पोलिस हवालदार प्रमिला निकम यांनी कथित पत्रकार आशिष तिवारी याच्या संगनमताने पवार यांच्या बॅगेतील तब्बल 20 लाख रुपयांची रोकड लांबवली. तसेच, केवळ साडेदहा लाख रुपये अधिकृत मुद्देमाल म्हणून दाखवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा कट रचला. तिवारी याने आपल्या गाडीत ठेवलेली रक्कम सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी निकम यांनी त्याला मदत केली आणि या सर्व गैरप्रकारात पोलिस नाईक अजित मेस्त्री याने त्यांना पूर्ण साथ दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याच गंभीर आरोपामुळे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. एक कोटींचा व्यवहार आणि प्रवासाची सुरुवात तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांचे शेजारी किरण आपटे यांच्या ओळखीतील ‘चव्हाण इंटरप्रायजेस’ला एक कोटी रुपयांची गरज होती. आपटे यांच्या मध्यस्थीने पवार ही रक्कम देण्यास तयार झाले. ठरल्यानुसार 18 जुलै रोजी हर्षवर्धन हे आपल्या कामगारासोबत एक कोटी रुपयांची रोकड घेऊन सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्माजवळ पोहोचले. तिथे किरण आपटेही आले. दुपारी साडेबाराच्या सुमारास चव्हाण इंटरप्रायजेसची गाडी तिथे आली. नऱ्हे येथील एचडीएफसी बँकेत ही रक्कम भरायची आहे असे सांगून आपटे, हर्षवर्धन, चालक विक्रम चाकणकर आणि अन्य एक व्यक्ती असे चौघे कारमध्ये बसले. त्यांच्यामध्ये एक कोटी रुपयांनी भरलेल्या दोन बॅगा होत्या आणि तेथून त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. नऱ्हे पुलावर गाडी अडवून दरोड्याचा थरार बँकेकडे जाण्यासाठी नऱ्हे पुलाखालून जाण्याऐवजी चालकाने गाडी थेट पुलावर घेतली. त्याचवेळी मागून आलेल्या एका दुचाकीने कारला आडवे लावून गाडी थांबवली. दुचाकीवरील दोघांनी स्वतःला पोलिस असल्याचे भासवले आणि ‘तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात’ असा आरोप करत गाडी बाजूला घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या दोघांनी आणि गाडीतील एका व्यक्तीने मिळून पैशांची बॅग बळजबरीने ओढण्यास सुरुवात केली. झटापटीदरम्यान एकाने हर्षवर्धन यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली. या गोंधळात किरण आपटे 73 लाख 50 हजारांची बॅग घेऊन कसेबसे गाडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, दुचाकीवरील अनोळखी व्यक्तीने चालकाला धमकावून गाडी थेट खेड शिवापूर पोलिस चौकीकडे नेण्यास भाग पाडले. पोलिस चौकीतील नाट्य आणि खाकी वर्दीचाच कट दुपारी दोनच्या सुमारास गाडी खेड शिवापूर पोलीस चौकीत पोहोचल्यावर, त्या अनोळखी व्यक्तीने (तोतया पत्रकार आशिष तिवारी) स्वतःला पोलिस सांगत दोन नंबरचा पैसा पकडून आणल्याचा बनाव सर्वांसमोर रचला. विशेष म्हणजे, त्या दिवशी सुट्टीवर असलेल्या राजगड पोलिस ठाण्यातील महिला हवालदार प्रमिला निकम तिथे खाकी वर्दीत उपस्थित होत्या आणि त्यांच्या मदतीला पोलिस नाईक अजित मेस्त्री हेही होते. या दोन्ही पोलिसांनी त्या तोतया पत्रकाराची बाजू घेत हर्षवर्धन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व अटकेची भीती घातली. सुदैवाने, या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने चौकीत धाव घेतली. वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे या पोलिसांचे आणि तोतया पत्रकाराचे बिंग फुटले व गायब झालेली काही रक्कम हर्षवर्धन यांना परत मिळाली. गुन्हा दाखल आणि फरार पोलिसांचा शोध सुरू या धक्कादायक प्रकारानंतर भयभीत झालेल्या हर्षवर्धन यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुरुवातीला या गुन्ह्यात दोन पोलीस कर्मचारी आणि तोतया पत्रकाराचे नाव टाळण्यात आले होते, मात्र नंतर पुरवणी जबाबात त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या आशिष तिवारीसह चौघांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कट रचणारे पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजित मेस्त्री यांच्यासह सहा जण अद्याप फरार आहेत. काही दिवसांपूर्वी कामशेत पोलिसांच्या खंडणी प्रकरणामुळे आणि आता राजगड पोलिसांच्या या दरोड्याच्या कारनाम्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Source link
एक कोटींच्या दरोडा प्रकरणात दोन पोलिस निलंबित:खाकी वर्दीची प्रतिमा मलिन केल्याने कठोर कारवाई, नेमके प्रकरण काय?