Headlines

एलआयसी पॉलिसीचा बहाणा अन् भयंकर कट:प्रॉपर्टीसाठी शिक्षिकेला नाक-तोंड दाबून संपवले; कल्याण गुन्हे शाखेकडून खुनाचा उलगडा




मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने एका ५३ वर्षीय शिक्षिका व एलआयसी एजंट महिलेची जबरदस्तीने मृत्युपत्रावर स्वाक्षरी घेऊन, त्यानंतर तिचे नाक-तोंड दाबून अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-०३ (कल्याण) यांनी या प्रकरणाचा तपास करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संगिता मारूती चंदनशिवे (वय ५३, रा. मोहने, आंबिवली) असे मृत महिलेचे नाव असून त्या चिंचपाडा येथील वेणुबाई पावशे शाळेत शिक्षिका व एलआयसी एजंट म्हणून कार्यरत होत्या. नेमकी काय आहे घटना? दिनांक १४ जुलै २०२६ रोजी संगिता चंदनशिवे या एलआयसीच्या कामासाठी शहापूर येथे जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या होत्या. मात्र, त्या परत न आल्याने आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या भावाने (प्रविण चंदनशिवे) कोळशेवाडी पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तपासादरम्यान, १६ जुलैरोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-घोटी मार्गावर एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेजसमोर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. असा उघडकीस आला कट कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान दिगंबर भागुजी आव्हाड (वय ४८, रा. आसनगाव, जि. ठाणे), तुषार मुरलीधर रत्नपारखी (वय ५२, रा. मोहने-आंबिवली, जि. ठाणे) या दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी इतर दोन साथीदार संतोष रमेश जाधव (रा. नाशिक) आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे (रा. आंबिवली) यांच्याशी संगनमत करून हा कट रचल्याची माहिती दिली. अशी केली हत्या आरोपींनी संगिता यांना नवीन एलआयसी पॉलिसी घेण्याचा बहाणा करून आसनगाव येथील भाड्याच्या खोलीत बोलावून घेतले. तेथे संगिता यांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर व मृत्युपत्रावर स्वतःची नावे वारसदार म्हणून नमूद करून मारहाण करत जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर नाक व तोंड दाबून त्यांची हत्या केली आणि मृतदेह कारमध्ये टाकून नाशिक-घोटी मार्गावर फेकून दिला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाडीवऱ्हे पोलीस ठाणे (जि. नाशिक) यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हेही वाचा.. भिवंडीत भीषण अपघात:ओव्हरटेकच्या नादात कारची 3 दुचाकींना धडक, उड्डाणपुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू भिवंडी शहरात आज एक भीषण अपघात झाला आहे. भिवंडीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने तीन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, एक दुचाकीस्वार थेट पुलावरून खाली फेकले गेला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *