![]()
भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, आता १७ ऑगस्टपर्यंत मतदारांच्या गणना अर्जांची नोंदणी आणि डीजीटायझेशन केले जाईल, तर प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नवीन कार्यक्रमानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम १७ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. हा कार्यक्रम ३० जून रोजी सुरू झाला होता. बीएलओच्या या कामातून मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचना देखील १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल. या कालावधीत प्राप्त झालेल्या गणना अर्जांचे डीजीटायझेशन पूर्ण झाल्यानंतर, जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेली प्रारूप यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या दावे आणि हरकतींची सुनावणी तसेच त्या निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून सुरू होऊन २२ ऑक्टोबरपर्यंत चालेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. सध्याच्या मतदार यादीनुसार, जिल्ह्यात एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदार आहेत. यापैकी, आतापर्यंत २१ लाख ३७ हजार १७२ (८३.८५ टक्के) मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झाले असून त्यांचे डीजीटायझेशनही पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील मतदार यादीतून १ लाख ३६ हजार ५०८ मतदार कायमस्वरूपी जिल्ह्याबाहेर गेले आहेत. याशिवाय, १ लाख ३ हजार ४०२ मतदार मृत झाले आहेत, तर ४२ हजार २१७ मतदारांची नावे दोन ठिकाणी आढळली आहेत. घरभेटीदरम्यान वारंवार संपर्क करूनही ११ हजार २१७ मतदार सापडले नाहीत आणि ९३३ मतदारांच्या बाबतीत विविध अनियमितता आढळून आल्या आहेत. ही सर्व नावे यावेळच्या मतदार यादीत समाविष्ट नसतील.
Source link
एसआयआरला पुन्हा मुदतवाढ:प्रारूप यादी आता 24 ऑगस्ट रोजी, बीएलओ 17 पर्यंत घेणार घरभेटी