Headlines

नांदगाव तालुक्याला विशेष पॅकेज द्या: शेतकऱ्यांची मागणी:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ‘विशेष पॅकेज’ची मागणी केली आहे. शिवसेना (उबाठा) समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पारंपरिक एनडीआरएफ निकषांनुसार मदत न देता, विशेष पॅकेज देण्याची त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सलग ३५ तास मुसळधार पाऊस झाला, ज्यात २९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात नदीच्या पुराचे पाणी साचून तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सोयाबीन, कापूस, तूर, फळपिके आणि भाजीपाला यांसारखी उभी पिके जमिनीसह वाहून गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, घरे जमीनदोस्त झाली आणि घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंगरुळ चव्हाळा, धामक, धानोरा शिक्रा, शिवणी आणि नांदगाव शहरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे अन्नधान्य, कपडे, भांडी आणि विद्यार्थ्यांची पुस्तके नष्ट झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, त्यांना राहण्यासाठी घरही उरले नाही. पिकांच्या नुकसानीसोबतच शेती उपयोगी स्प्रिंकलर पाईप, टिनपत्रे, तारांचे कुंपण आणि बांधलेल्या विहिरीही खचल्या आहेत. पाण्याची मोटर, कृषी पंपाचे इलेक्ट्रिक पोल पडले असून, सोलरचे कृषी पंप खराब झाले आहेत. कांदा चाळीतील कांदाही खराब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गायी, बैल, बकऱ्या आणि कोंबड्याही पुरात वाहून गेल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीत शेतात जाणारे पाणंद रस्ते, पूल, बंधारे, छोटे नाले आणि डांबरी रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. यामुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यावेळी प्रकाश मारोटकर यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव संतोष सुरजुसे, शिवसेनेचे बाळासाहेब राणे, शेतकरी सुनील गुरमुळे, वासुदेव लोखंडे, गुणवंत चांदुरकर, रमेश मांडवगडे, प्रकाश ब्राम्हणवाडे, सुनील ब्राह्मणवाडे, गजानन मारोटकर, लोकेश उटबगले, रवि ठाकूर, दामोधर ब्राह्मणवाडे, बाळा सुने, बाबराव राऊत, विजय सुने, वाल्मिक दहातोंडे, सुरेंद्र गावफळे, नितीन दुधे, शंकर मांडवगडे, विजय पेटले आणि पंकज पिंपळकर आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *