Headlines

सोने तारण फसवणूक, 19 तक्रारी दाखल:केरळहून पथक दाखल, उद्या स्ट्रांगरुममधील ऐवजाची मोजदाद होणार




अमरावती येथील एसटी स्टँड रोडवरील विमको टॉवरमधील एका वित्तीय संस्थेच्या स्थानिक शाखा व्यवस्थापकाने काही ग्राहकांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. मंगळवारी दुपारी ही बाब उघडकीस आली, त्यानंतर सोने गहाण ठेवणाऱ्या ग्राहकांनी पोलिसांत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली. मंगळवार सायंकाळपर्यंत सुमारे 19 ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी कंपनीच्या कार्यालयावर गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त संजय खताळे यांनी लक्ष घालून घटनास्थळी पोलिस पाठवले. पोलिसांनी ग्राहकांना सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. दरम्यान, व्यवस्थापकाने नेमके किती सोने आणि पैसे पळवले, याची मोजदाद स्ट्रांगरुम उघडल्याशिवाय होणार नाही. यासाठी संबंधित वित्तीय संस्थेची तीन सदस्यीय अंतर्गत लेखापरीक्षण (इंटर्नल ऑडीट) टीम केरळहून अमरावतीत दाखल झाली आहे. या चमूला मोजदाद करताना कोणताही त्रास होऊ नये किंवा ग्राहकांकडून कार्यालयात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कंपनीने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. कदाचित बुधवारी सकाळी त्यांना पोलिस संरक्षण पुरवले जाईल आणि स्ट्रांगरुममधील ऐवजाची मोजदाद सुरू केली जाईल. स्ट्रांगरुममधील मोजदाद पूर्ण झाल्यानंतरच नेमके किती ग्राहकांचे सोने आणि रोख रक्कम व्यवस्थापकाने लंपास केली, हे स्पष्ट होईल. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल व्हायचा असून, आर्थिक अनियमिततेशी संबंधित असल्याने आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो गुन्हा दाखल केला जाईल, असे एसीपी संजय खताळे यांनी सांगितले. मोजदाद पूर्ण झाल्यावर कंपनीतर्फेही स्वतंत्र तक्रार दाखल केली जाईल. हा व्यवस्थापक सोने आणि रोख रक्कमेसह सोमवारपासून गायब झाला आहे. सुरुवातीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो ड्युटीवर आला नसावा, असे समजण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशीही तो गैरहजर राहिल्याने हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. सध्या कंपनीचे कार्यालय कुलूपबंद असून, पोलिस संरक्षणात स्ट्रांगरुम उघडले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *