Headlines

एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार:पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका




महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची तसेच मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली होती. यावेळी एसआयआर प्रकरणी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली होती. पात्र मतदारांची नावे वगळण्यात येऊ नयेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यावर आता राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून कमी केले जाणार नसल्याचे आश्वासन एस. चोकलिंगम यांनी दिले आहे. 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केले जाणार असून त्यात आपले किंवा आपल्या पालकांचे नाव जुळत आहे का हे पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. एसआयआर प्रक्रिया 29 जुलै पर्यंत एस. चोकलिंगम यांनी पुढे सांगितले की, राज्यातील एसआयआर प्रक्रिया ही 29 जुलै पर्यंत सुरू राहणार असून मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच बीएलओ घरी आल्यानंतर कोणी उपस्थित नसेल तर त्यांना 29 जुलैनंतरही त्यांचे नाव नोंदवता येणार आहे. पात्र मतदाराचे नाव यादीतून विनाकारण वगळले जाणार नाही पुढे बोलताना एस. चोकलिंगम म्हणाले, एसआयआरची ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून विनाकारण वगळले जाणार नाही. या कामासाठी राज्यात तब्बल 1 लाख 253 बूथ लेव्हल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. जनगणनेचे काम संपल्यावर लगेचच या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती चोकलिंगम यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाची घोषणा केली असून, या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. मात्र या प्रक्रियेवर महाविकास आघाडीने गंभीर आक्षेप नोंदवल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील स्थलांतरितांनी बीएलओशी संपर्क साधावा दरम्यान, राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या तपशीलाची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी 1 लाखांहून अधिक बीएलओ कर्मचारी घरोघरी जायन पडताळणी करणार आहेत. यात ड्यूप्लिकेट नावे शोधणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अपडेट करणे तसेच जुन्या यद्यांशी मॅपिंग करण्याचे काम केले जाणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने नागरिक दुसरीकडे राहायला गेले आहेत, त्यांनी स्थानिक बीएलओशी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन एस. चोकलिंगम यांनी केले आहे. ऑनलाइन सेल्फ-मॅपिंग मुंबई आणि इतर प्रमुख शहरी भागांमधील कामकाजाची संभाव्य संथ गती लक्षात घेत निवडणूक आयोगाने मतदारांना मोठा दिलासा दिला असून, नागरिकांना घरबसल्या आपली माहिती डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्यासाठी आता ‘ऑनलाइन सेल्फ-मॅपिंग’चा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच बीएलओच्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान नागरिकांना आपली अधिकृत कागदपत्रे सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाणार असल्याने, या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आयोगाकडून घेण्यात आली आहे. मतदार यादी पुनरीक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक: 20 ते 29 जून: गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
30 जून ते 29 जुलै: मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील.
5 ऑगस्ट: प्रारूप मतदार याद्यांची अधिकृत प्रसिद्धी केली जाईल.
5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर: मतदारांना प्रारूप यादीवर आपले दावे आणि हरकती नोंदवता येतील.
3 ऑक्टोबर पर्यंत: प्राप्त झालेले सर्व दावे आणि हरकती निकालात काढल्या जातील.
7 ऑक्टोबर: महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *